पहिला पाऊस मराठी निबंध - Pahila Paus Nibandh Marathi: पहिला पाऊस आला की एखादा लहानपणीचा बालमित्र ब-याच दिवसांनी भेटावा असं वाटतं. हवाहवासा दोस्त भेटल
पहिला पाऊस मराठी निबंध - Pahila Paus Nibandh Marathi
पहिला पाऊस मराठी निबंध: जून महिना ! संध्याकाळची वेळ! आळसटलेली मी, काही वाचत लोळत पडली होते. सहज खिडकीतून नजर बाहेर गेली.... आकाश काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरले होते. वातावरण कुंद होते. वारा पडलेला होता. संध्याराणी दुर्मुखलेली होती. रस्ते माणसांनी दुथडी भरून वाहत होते.... ढगांचा गडगडाट झाला. पाठोपाठ वीज चमकली. टपोरे, थेंबांचे मोती खाली झेपावले. लोकांची त्रेधातिरपीट उडाली. ‘आता मोटा पाऊस येणार' (पहिला पाऊस) ही खात्री पटून रस्ते उधळले गेले. छत्री, रेनकोट नसल्याने निःशस्त्र सेनेप्रमाणे पळापळ झाली.
फेरीवाले, पथारीवाले गाशा गुंडाळू लागले. बाहेर लावलेला माल दुकानात सुरक्षित ठिकाणी हलवताना दुकानदारांच्या नाकी नऊ येऊ लागले. वाहनांचे वेग वाढले. नाक्यावरच्या सुस्तावलेल्या रिक्षा अधीर प्रवासी पोटी धरून धावू लागल्या..... पुन्हा एकदा वीज लकाकली, ढग गरजले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. पाहता पाहता रस्ते निर्नायकी झाले. मेघांच्या गर्जनेला प्रत्युत्तर देणारा कोणी धैर्यधर उरला नाही.... मी पळत पळत वर गच्चीवर गेले - पहिला पाऊस डोळे भरून पाहण्यासाठी, अंगावर घेण्यासाठी !
डोक्यावरच्या आकाशानं काळा मेकअप जणू केला होता. अंधारून आलं होतं. मृद्गंधाचं अत्तर वातावरणात उधळलं गेलं होतं. पक्ष्यांनी झाडांचा आश्रय घेतला होता. 'अंगे भिजली जलधारांनी' अशी चिंबावस्था झाली होती. काया रोमांचित होत होती. संध्याराणीच्या दरबारात मेघमल्हार मस्त रंगला होता. साठल्या पाण्याच्या मंचावर थेंबांचा बॅलेडान्स चालला होता. घरांचे पत्रे दोघांना ताल देत होते. वेलींवरची फुले त्या तालावर डोलत होती. झाडे मधूनच पानांचे पंख फडफडवून दाद देत होती.... माझं मन प्रसन्नतेचा पिसारा फुलवून मोराप्रमाणे थुईथुई नाचत होतं.
पावसाचा जोर वाढला तशी मी पण चिमणीसारखी आडोशाला गेले. 'कडकड शब्द करोनि' घन तांडव करू लागले. मेघराजाचा मेदिनीशी चाललेल्या नाजूक शृंगारातील कोवळेपण संपून धसमुसळेपणा सुरू झाला होता. नव्हे, आडदांडपणाच चालला होता.... आकाशातील जटा आपटणारा, थेंबांच्या तडतडाटात बेभान नाचणारा, मेघांचे पखवाज वाजवत शंख फुंकणारा रुद्राचा अवतारच अवतीर्ण होत होता.... जटांतून मुक्त झालेली भागीरथीच धरतीच्या रंगमंचावर थयथय नाचू लागली.
भाजलेल्या धरतीला भिजताना काय सुख वाटत असेल ! वाट पाहणाऱ्या बळीराजाला किती हलकं वाटलं असेल. पहिला थेंब चोचीत पडताना चातकाला किती समाधान वाटलं असेल, पहिला थेंब मिठीत घेताना सागराच्या शिंपल्याला किती आनंद झाला असेल.... हे सारं मी अनुभवलं, पहिला पाऊस अंगावर घेताना ! कालांतराने बाहेरचा थांबला तरी मनात पाऊस कोसळतच होता, किती वेळ कोण जाणे !
पहिला पाऊस निबंध निबंध - Pahila Paus Marathi Nibandh
पहिला पाऊस आला की एखादा लहानपणीचा बालमित्र ब-याच दिवसांनी भेटावा असं वाटतं. हवाहवासा दोस्त भेटल्यावर जो आनंद होतो, तोच आनंद मला पहिला पाऊस आल्यावर वाटतो.
कुणाला सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायची हौस असते, तर कुणाला रात्रीच्या दाट चांदण्यात फिरायची हौस असते, तर कुणाला संध्याकाळच्या गार हवेत फिरायची हौस असते. मला मात्र पहिल्याच पावसात भिजत-भिजत भटकायची हौस आहे. कारण पहिला पाऊस येतो तो कोवळ्या उन्हातल्यासारखा गारांचा अंगणात सडा घालीत.
आपण एखाद्या मित्राची वा पाहुण्याची बराच वेळ वाट बघत असतो. पण ठरल्यावेळी ठरल्या दिवशी तो येत नाही. काही अडचण असेल, असं समजून तो उद्या येईल असं आपण आपल्या मनाचं समाधान करतो, पण तो दुस-या दिवशी पण येत नाही. मग लागोपाठ चार-पाच दिवस झाले तरी येत नाही. आपली निराशा होते. काळजी वाटते, काय झालं असेल. कळवलंसुद्धा नाही. मग आपण त्याची वाट पाहायची सोडून देतो. त्याला जवळजवळ विसरतो. पण आतल्या आत मनाची घालमेल होतच राहते. मग बहुतेक तो उशिरा येईल किंवा येणारच नाही अशी मनाची अटकळ करतो आणि आपल्या कामाच्या धबडग्यात खरंच त्याला विसरून जातो आणि मग एके दिवशी अचानक पत्र वा तार यावी असा तो येतो.
मला शहरापेक्षा गावाकडच्या पहिल्या पावसाचं फार वेड आहे. गावाकडं आपुलकीनं भरून आलेलं आभाळ पाहायला मिळतं. सावळे मेघ प्रत्यक्ष डोळे भरून पाहता येतात. झाडे पावसाची वाट बघत त्याच्या स्वागताला आतुरलेली बघता येतात. पक्षी झाडावर घरटी बांधून त्याची चाहूल देताना आपण आश्चर्याने अवाक् होतो. उन्हाळयात पोळलेला माळ त्याची तर आतुरतेने वाट बघत असतो. माणसं घरे-दारे शाकारून त्याच्या येण्याची प्रार्थना करतात.
वारा त्याच्या आगमनाची शिट्टी वाजवत असतानाच आपण गावाबाहेर उघडया माळावर भटकायला गेलो तर पहिल्या पावसात भिजण्याची लज्जत आणखी वाढते. मी तर मोरासारखा वेडा होऊन नाचतो.
पहिला पाऊस मराठी निबंध - Essay on Pahila Paus in Marathi
पाऊस किती लहरी ! जूनची सात तारीख सरली, तरी पावसाचा पत्ता नव्हता. एवढेच काय! पावसाची दूरवर देखील कुठे चिन्हेही दिसत नव्हती. उकाड्याने माणसे बेजार झाली होती. पावसाचे नक्षत्र कुठे दडी मारून बसले होते? जमिनीला भेगा पडल्या होत्या. उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. उकाड्याने लोक अतिशय हैराण झाले होते पावसाचे आगमन जसजसे लांबत होते, तसतसे लोकांच्या तोंडचे पाणी पळत होते. नानाविध प्रकारे लोक वरुणराजाची आराधना करीत होते. जमीन नांगरून शेतकरी खिन्नतेने आकाशाकडे डोळे लावून बसला होता.
एके दिवशी अचानक सभोवार अंधारून आले. सोसाट्याचा वारा सुटला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरले. 'आला, आला, पाऊस आला !' असे म्हणत ते पावसाच्या स्वागताला सज्ज झाले. आणि खरोखरच पाऊसकोसळू लागला. टपोरे थेंब बरसू लागले. खूप उशीर झाल्यामुळे जणू त्यांना कोसळण्याची घाई झाली होती. हा काळ्या ढगांचा तानसेन जणू मेघमल्हाराच्या ताना घेत असावा. आगमनाला उशीर झाल्यामुळे त्याला अपराधी वाटले असावे, म्हणून सतत अखंडपणे अविरत कोसळत होता. तीन तासांनंतर पाऊस ओसरला. अचानक आला तसा अचानक थांबला. केवढा किमयागार हा पहिला पाऊस! भोवतालच्या वातावरणात कितीतरी कायापालट झाला होता.
आकाशातील काळे अभ्र हरवले होते. आकाश स्वच्छ झाले होते. तृषार्त धरती टवटवीत दिसत होती. पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. झाडात दडलेली, पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडवून जणू वर्षाराणीचे आभार मानत होती. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्यांचे डोळे डबडबले होते. आनंदाश्रू होते ते ! असा हा किमयागार पहिला पाऊस!!
COMMENTS