चांदण्या रात्रीची सहल निबंध मराठी- नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात चांदण्या रात्रीचा मराठी निबंध लिहिला आहे, ज्यामध्ये चांदण्या रात्रीचा प्रवास वर्णन
चांदण्या रात्रीची सहल निबंध मराठी- नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात चांदण्या रात्रीचा मराठी निबंध लिहिला आहे, ज्यामध्ये चांदण्या रात्रीचा प्रवास वर्णन केला आहे.
चांदण्या रात्रीची सहल निबंध मराठी - Chandanya Ratrichi Sahal Nibandh
चांदण्या रात्रीची सहल निबंध मराठी- थंडीचे दिवस! 'नभ मेघांनी आक्रमिले' ची जागा “शरदाचे चांदणे, मधुवनी फुलला निशिगंध " ने घेतली. चंद्रकिरणांनी मनसागरालाही उचंबळून आलं आणि आम्ही चांदण्यात सैर (चांदण्या सहल) करायचं ठरवलं.... गावाबाहेरील माळरानावरच्या गोल्फ ग्राऊंडवर जाण्याची माझी कल्पना सर्वांनी उचलून धरली आणि आम्ही रात्रीचे नऊ साडेनऊच्या सुमारास ग्राऊंडवर गेलो.
विस्तीर्ण गोल्फ ग्राऊंडवर पाय ठेवताच माझ्या चित्तवृत्ती बहरून आल्या. एरव्ही अंधाराच्या पडद्याने झाकून ठेवलेला निसर्ग खजिना पिठूर चांदण्यात उजळून निघून दिमाखदार दिसत होता..... हिरवी मऊ लुसलुशीत हिरवळ पायाला गुदगुल्या करीत होती. मंद वाहणारा वारा अंगावर शिरशिरी आणत होता. आकाश गालिच्यावर चांदण्यांचा काटेरी हलवा विखुरला होता. टेकडीमागून डोकावणारा रजनीनाथ मन टवटवीत करत होता.... मनाला आलेली प्रसन्नता काही औरच होती. शीळ घालीत मी चांदण्याच्या शॉवरबाथखाली नहात होतो. चांदणं पिऊन किशोरावस्थेचं चकोरावस्थेत रूपांतर झालं.
सामान लावून आम्ही मुले स्वच्छंदपणे हुंदडू, खेळू लागलो. त्यात मोठी माणसेही शिंग मोडून सामील झाली. पळापळी, लंगडी, चोरशिपाई... भन्नाट मजा आली. शिपाई बनून चोरांच्या मनातील चांदणं शोधलं.... झाडाझुडपात काजव्यांच्या चंद्रज्योती फुललेल्या पाहताना मन हरखून गेलं.... शोधाशोधीत पाण्याचा तलाव, एक छोटा धबधबाही गवसला, अन् स्व. मैथिलीशरण गुप्तांच्या 'पंचवटी' काव्यातील ओळी आठवल्या.
चारुचंद्रकी चंचल किरणे, खेल रही थी जलथल में ।
क्या ही स्वच्छ चाँदनी बिछी हुई थी अंबर और भूतल में ।।
दमून धपापत्या उरांनी जमिनीवर गोल बसलो. निथळत्या अंगांवरील घामाचे
बिंदू वाऱ्याने पिऊन टाकले. चंद्राच्या किरणांनी हृदयीच्या चांदण्याला साद दिली आणि ते सुरांच्या चांदण्या बनून ओठी आले - एकामागून एक चंद्रावरची गाणी बनून ! 'तोच चंद्र नभात ' पासून 'चंदा की चांदनी में झूमे झूमे दिल मेरा ।' 'चांदण्यात चालू दे मंद नाव नाविका' पासून 'खोया खोया चाँद' पर्यंत गाणी रंगली..... आम्हीही रंगलो !.... नावाच्या, गावाच्या भेंड्या, नकला.... कलेकलेने रंगत वाढतच गेली.
सोबत आणलेल्या खाद्य पदार्थांचा फन्ना उडवताना पार्टी जोक्सनी खमंगपणा आणला. केशरी दुधाचा आस्वाद घेताना अमृताची चव वाटली. मन चंद्रकिरणांनी पाझरणाऱ्या चंद्रमण्यासारखं पाझरू लागलं.... चंद्रकिरणांनी फुलणाऱ्या नीलकमलाप्रमाणे फुलून आलं.... चढत्या रात्रीबरोबर मनाची झिंगही चढत गेली.
वाटलं -
“ चांदणे मनातले भरून वाहू दे
जीवनातील घडी अशीच राहू दे ।”
चांदण्या रात्रीची सहल निबंध मराठी - 2
दरवर्षी आम्ही कोजागिरी पौर्णिमा आमच्या घराच्या गच्चीवर साजरी करतो; पण यंदा सर्वानुमते समुद्रकिनारी सहलीला जाण्याचे ठरले. सहल म्हटली म्हणजे आधीच आम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटतात, त्यात ही चांदण्यातील सहल म्हणजे दुधात केशराचीच भर!
अखेर जिची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ती कोजागिरीची रात्र उगवली. मोठ्या अधीरतेने आम्ही समुद्रकिनारी जायला निघालो. सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते. जो तो खाऊच्या पिशव्या आणि पाण्याच्या बॅगा खांदयावर अडकवून सहलीसाठी सज्ज झाला होता.
ठरल्याप्रमाणे आम्ही समुद्रकिनारी पोचलो. चांदण्याने नटलेले किनाऱ्यावरचे नयनरम्य दृश्य पाहून माझे भान हरपले. संपुर्ण सागर आणि किनारा चंद्रप्रकाशात न्हाऊन निघाला होता . सागराच्या पाण्याचा तो रुपेरी वर्ण पाहून मला, बोरकरांच्या पंक्ती आठवल्या-
'माझ्या गोव्याच्या भूमीत, सागरात खेळे चांदी !'
पायांशी लडिवाळपणे बिलगणाऱ्या लाटा जणू चांदीच्या लडीच आणून आमच्यापुढे पसरवत होत्या. समुद्राने आमच्या पुढ्यात उधळलेले ते चंदेरी वैभव पाहून त्या क्षणी वाटले की, आपल्याइतके श्रीमंत आपणच !
एव्हाना आमच्याबरोबरची काही मंडळी समुद्रकाठच्या वाळूत चक्क आडवी झाली होती. कोणत्याही अंथरुणाची वा पांघरुणाची त्यांना गरज नव्हती. खाली रुपेरी वाळूची बिछायत, अंगावर रुपेरी आकाशाचे पांघरूण. तेव्हा जाणवले या चांदण्यात वाळ नुसतीच सजलेली नाही, तर ती मृदू मुलायमही झाली आहे.
वाळूप्रमाणे साऱ्यांची मनेही अतिशय हळुवार झाली होती. हास्यविनोद, थट्टामस्करी, गप्पा, गाण्यांची मैफल यांत वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. पहाटेला पाखरांच्या किलबिलाटाने चांदणी रात्र सरल्याची जाणीव आम्हांला झाली आणि 'पुनवे'च्या सहलीचा आनंद मनात साठवून आम्ही घरी परतलो.
चांदण्या रात्रीची सहल निबंध मराठी - 3
माझे बाबा व त्यांचे तीन मित्र यांची घनिष्ठ मैत्री आहे. सर्वजण सहकुटुंब एकमेकांकडे जातात - येतात. त्यामुळे चारही कुटुंबांमध्ये मैत्रीचे, स्नेहाचे संबंध निर्माण झाले आहेत. आम्ही सर्वजण वर्षातून एखादी तरी एकत्र सहल करतो. एकदा बाबांच्या मित्रांपैकी कोणीतरी एक आगळी, सुचवले की, 'आपण चांदण्या रात्रीची सहल काढू या'. एकदा एखादी कल्पना मनाला पटली की, ती अमलात आणायला बाबांच्या मित्रांना वेळ लागत नाही.
आम्ही सहलीसाठी मे महिन्यातील वैशाखी पौर्णिमेचा दिवस निश्चित केला. रात्री दहानंतर आम्ही निघालो. पौर्णिमेच्या त्या रात्री आकाश स्वच्छ व निरभ्र होते. डोंगराकडे जाणारा रस्ता माळरानावरून जात होता. तेव्हा त्याच रस्त्याने डोंगर गाठायचा, असे आम्ही ठरवले. सारे गाव आकाशाची दुलई पांघरून शांतपणे झोपले होते. रात्र पौर्णिमेची असल्याने आज रस्त्यावरचे दिवे लावले गेले नव्हते की काय, कोण जाणे! मात्र त्यामुळे चांदण्याचे सौदर्य आम्हांला अनुभवता आले. चांदण्याला 'पिठूर' म्हणणारी व्यक्ती खरोखरच कविमनाची असावी! मे महिन्याचे दिवस असूनही शीतल चंद्रप्रकाशामुळे हवेतील सौम्य गारवा मनाला सुखावत होता. त्यामुळे सहलीची लज्जत अधिकच वाढली होती. बागांतून फुललेल्या रातराणीमुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते. अशा प्रसन्न वातावरणात शब्द मुके न झाले तरच नवल! चांदण्यात न्हाऊन निघत असताना आम्ही डोंगरमाथ्यावर केव्हा पोहोचलो, ते कळलेदेखील नाही.
डोंगरमाथ्यावरील दृश्य विलोभनीय होते. दिवसा ओक्याबोक्या दिसणाऱ्या डोंगरांनी रुपेर शाल पांघरली होती. करवंदांच्या जाळ्यांवर जणू चांदीची फुलेच फुलली होती. मातीचा स्पर्शही मुलायम वाटत होता. धरतीवर चांदण्याच्या जणू सरी पडत होत्या. आकाशातील पूर्ण चंद्राला कवी कुसुमाग्रजांनी 'स्वप्नांचा सौदागर' असे का संबोधले असावे, ते उमगले. माझ्या बाबांना हे सांगितले, तेव्हा त्यांच्या मित्रांच्याही मनात काही गीतांच्या ओळी जाग्या झाल्या. कुणाला 'चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले' ही ओळ आठवली, तर कुणाला 'रात का समा झुमे चंद्रमा' ही हिंदी चित्रपट गीतातील ओळ आठवली आणि मग पाहता पाहता चांदण्यासंबंधीच्या गाण्यांचा पूर लोटला. आमचा मित्र सुधाकर याने 'पुनवेचा चंद्रम आला घरी, चांदाची किरणं दर्यावरी' हे गाणे सुरेल आवाजात म्हटले. रात्री करवंदांच्या जाळीत शिरणे धोक्याचे असल्याने 'डोंगरची काळी मैना' दुरूनच पाहावी लागली; पण त्यामुळे भुकेची आठवण झाली. आम्ही रसिकतेने फराळाची निवड केली होती
रुपेरी चांदण्यात खाण्यासाठी निवडलेले पदार्थही तसेच होते. पांढरी स्वच्छ मलईची बर्फी, पांढरीशुभ्र हलकीफुलकी इडली आणि मस्त, मऊ दहीभात ! चांदण्यात रात्रभर विहरत असताना दुःख, द्वेष, असूया, चिंता हे सारे विकार विरून गेले होते. ही सारी किमया होती त्या धवल चांदण्याची ! चांदीच्या रसात जणू चराचर न्हात होते. यापूर्वी आम्ही अनेक सहली काढल्या, पुढेही काढू; पण चांदण्या रात्रीच्या त्या सहलीची मौज अगदी वेगळीच
COMMENTS