Vishnushastri Chiplunkar Information in Marathi : या लेखात आम्ही विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे चरित्र मराठी माहिती देत आहोत. Read Here Vishnushastri K
विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी माहिती - Vishnushastri Chiplunkar Information in Marathi
विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी माहिती : शास्त्रीबोवांना एक प्रचंड लाट परतवायची होती. स्वाभिमान जागवून नवपराक्रमास राष्ट्र उभे करावयाचे होते. त्या काळात जाऊ तेव्हाच त्यांच्या टीकेचे मर्म कळेल. परंतु ते प्रतिगामी नव्हते. लोकभ्रमासारखे निबंध त्यांनी लिहिले. “स्त्रीचा पती मेला म्हणून जर ती अशुभ तर कोणाची आई मेली, बाप मेला, तर तोही का अशुभ मान नये, पत्नी मरून 13 दिवसही झाले नाहीत तो पुन्हा लग्नाला उभा राहणारा मात्र शुभ ठरावा ना?" असे ते विचारतात.
"मराठी भाषेचा मी शिवाजी आहे. माझ्यापूर्वी असा कोणी नव्हता, पढे होणार नाही." अशी अभिनव अभिमान भाषा उच्चारणारे श्री. विष्णुशास्त्री चिपळूणकर, 1882 मध्ये मार्चच्या 17 तारखेस गुरुवारी पहाटे आपली अवघी बत्तीस वर्षांची; परंतु असीम तेजस्वी अशी कारकीर्द संपवून देहरूपाने निघून गेले.
1850 च्या 20 मेला त्यांचा जन्म. जी स्वप्ने त्यांनी मनात खेळवली, जी प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत धडपड केली ती स्वप्ने आज स्वातंत्र्यप्राप्ती होऊन काही अंशी पूर्ण झाली आहेत.
प्राथमिक शिक्षण होऊन ते इंग्रजी शिकू लागले. पदवीधर झाले. वडील कष्णशास्त्री त्यांना वकील, मुन्सफ व्हायला सांगत होते; परंतु भाषेची सेवा करणे त्यांनी मनात ध्येय ठरविले होते. वडील मराठीतील नामांकित लेखक. 25 वर्षे वडिलांनी हातात खेळवलेली लेखणी पुत्राने आपल्या हातात घेऊन मराठी भाषेत चमत्कार करून दाखविले. 1874 मध्ये निबंधमाला' मासिक सुरू होणार म्हणून 'ज्ञानप्रकाशा'त जाहिरात झळकली. सात वर्षे हे तेजस्वी मासिक चालले. त्याचे 84 अंक निघाले.
सारे लिखाण एकटाकी. शास्त्रीबुवाच निबंध लिहीत, परीक्षणे लिहीत, विनोदी चुटके लिहीत, थोरामोठ्यांच्या आख्यायिका देत. इतिहास, इंग्रजीभाषा, जॉन्सन, मोरोपंत, लोकहितवादी, देशाची सद्य:स्थिती इत्यादी पुस्तककार होतील असे निबंध त्यांनी लिहिले. मराठी भाषा वाटेल तो विचार, वाटेल ती भावना व्यक्तवू शकते ही गोष्ट नवसुशिक्षितांच्या नजरेस त्यांनी आणून दिली.
भारत परतंत्र झाला होता. 57 चा प्रयत्नही संपला. मिशनरी व काही नवसुशिक्षित भारतीय इतिहास व संस्कृती यावर जहरी टीका करीत होते. ज्याने त्याने उठावे व प्राचीन भारतावर दगड मारावे. अशावेळेस ही धीरोदत्त मूर्ती उभी राहिली व सर्व घरचे व परके टीकाकार थंड पडले. शास्त्रीबोवांना लोकहितवादी, महात्मा जोतिबा, न्यायमूर्ती रानडे, दयानंद वगैरेंवरही प्रखर टीका करावी लागली. जॉन्सनवरच्या निबंधाच्या अखेरीस लिहितात, "प्रस्तुत चरित्रापासून नवीन विद्वानांनी सतत उद्योग करण्याविषयी उपदेश घ्यावा. त्यांना हल्ली जी पोकळ घमेंड वाटते की, विश्वविद्यालयातून आपण पार पडलो की, ज्ञानाची अत्यंत सीमा गाठली, ती त्यांनी अगोदर दडवली पाहिजे. तरुणजनांस वाचण्यालायक नानाप्रकारची मनोरंजक पुस्तके, बहुश्रुत लोकांच्या उपयोगी पडण्यासारखे तहेतहेच्या माहितीचे चमत्कारिक ग्रंथ, देशातील जनी कविता व इतिहास साऱ्या भारतवर्षीयांच्या किंबहुना साऱ्या जगाच्या प्रतीचे व पूज्यबुद्धीचे स्थान झालेली जी प्राचीन गीर्वाण भाषा. त्यात काय काय ज्ञानभंडार आहे, फारशी भाषेत काय मौज आहे. याविषयी शोध, हिंदुस्थानी, गुजराथी वगैरे एतद्देशीय भाषांचा मराठीशी कितपत संबंध आहे. व्याकरणरीत्या सर्वांचा कसकसा मेळ आहे. इत्यादी उद्योग करण्याचे आमच्या पुढारी मंडळीने मनावर घेतले असते, तर आजची लोकांची स्थिती किती निराळी असती? यासारखेच देशी शेतीकडे व देशी व्यापाराकडे जर कोणी लक्ष दिले असते व आपल्या इंग्रजी ज्ञानाचा लाभ देशबंधूस त्यांच्या भाषेच्या द्वारा करून दिला असता व शेकडो व्यावहारिक कृत्यांचा संबंधानेही त्यास माहिती करून दिली असती, तर त्यात सर्वांस केवढे भूषण झाले असते!
त्यांनी सरकारी नोकरी सोडली. न्य. इंग्लिश स्कूल एक जानेवारी 1880 मध्ये स्थापिले. मुलांना पुस्तके हवीत म्हणून किताबखान, छापायला हवीत म्हणून चित्रशाळा असे उद्योग आरंभिले. आपल्याकडे चित्रांची प्रथा नव्हती. चित्रशाळेतून 'रामपंचायतन' हे पहिले रंगीत चित्र छापले गेले. हजारो प्रती खपल्या. पुढे केसरी व मराठा ही दोन साप्ताहिके सुरू केली. निबंधमाला बंद करून ग्रंथमाला सुरु करणार होते; परंतु एके दिवशी फोटोसाठी उन्हात उभे राहिले. घेरी येऊन पडले. हाच आजार. याच आजारात ते देवाघरी गेले.
"तुम्ही इतके कडक कसे लिहिता?" असे कोणी विचारले तेव्हा ते म्हणाले, ("आमचा एक पाय तुरुंगात असतो.") ते मेले तेव्हा केसरीवर खटला चालूच होता. आगरकर, टिळक हे डोंगरीच्या तुरुंगात गेले तेव्हा विष्णुशास्त्री देवाघरी होते; परंतु त्यांची तयारी होती. त्या काळात ते गडगंज पैसा मिळविते. एकदा न्यू इंग्लिश स्कूल पहायला तेलंग आले होते. ते म्हणाले, “अशा संस्थेत काम करावे, असे मलाही वाटते; परंतु दोन लाख रुपये शिल्लक टाक दे. अजून काही हजार कमी आहेत!" विष्णुशास्त्री यांचा त्याग यावरून दिसून येईल. ते पुस्तके घेण्यात पैसा खर्चित. पुण्यात टाउन हॉल करण्यासाठी सभा भरली. आकडे कोण घालणार? कोरा कागद एका हातातून दुसऱ्या हातात जात होता. शास्त्रीबोवांनी आपल्या एक महिन्याच्या पगाराचा आकडा घातला!
तेव्हा ते सरकारी हायस्कुलात शिक्षक होते. असा हा कर्मवीर होता. त्यांनी हजारोंना स्फूर्ती दिली. त्याचा 'इतिहास' हा निबंध वाचूनच राजवाडे त्या कार्यार्थ उभे राहिले. विष्णुशास्त्री वारल्याचे ऐकून, “मृत्यू म्हणजे काय ते मला आज कळले" असे राजवाडे म्हणाले. टिळक, आगरकर सारे याच त्यागाच्या शाळेत तयार झाले. "His fall was like the fall of Roman Empire" स्विफ्टवे मरण रोमन साम्राज्याच्या पडण्याप्रमाणे वाटले असे एकाने म्हटले आहे. निबंधमालाकारांचे ते मरण असेच वाटले. अवघ्या 32 वर्षांच्या आयुष्यातील खटाटोप! ते आद्यशंकराचार्य अद्वैताचा संदेश देऊन 32 व्या वर्षीच निजधामास गेले. हा नवभारताचा द्रष्टा महापुरुषही त्यागाची ज्ञानोपासनेची, देशभक्तीची दृष्टी देऊन, नवप्रकाश देऊन निघून गेला.
COMMENTS