हुतात्मा वीर भाई कोतवाल मराठी माहिती - Hutatma Veer Bhai Kotwal Information in Marathi सर्वस्व अर्पावयाचे, महात्माजींचे हे दोन मंत्र घेऊन भाई कोतवाल आ
हुतात्मा वीर भाई कोतवाल मराठी माहिती - Hutatma Veer Bhai Kotwal Information in Marathi
हुतात्मा वीर भाई कोतवाल मराठी माहिती: जे जे मानवतेला मारक आहे, आत्मविकासाच्या आड येणारे आहे त्याला 'चले जाव' म्हणायचे आणि तोंडाने केवळ न म्हणता त्यासाठी 'करेंगे या मरेंगे' या निर्धाराने धडपडायचे, सर्वस्व अर्पावयाचे, महात्माजींचे हे दोन मंत्र घेऊन भाई कोतवाल आपल्या तालुक्यात गेले. ह्याच लढ्यात त्यांनी प्राणाहुती दिली.
आज देश स्वतंत्र आहे. स्वातंत्र्याचा लाभ घरोघर अजून जावयाचा आहे; परंतु परसत्ता दवडून सर्वांचे संसार सुखाचे करण्यासाठी जो स्वातंत्र्यसंग्राम करावा लागला त्यात ज्ञात अज्ञात अनेकजणांचे त्याग आहेत. अनेकांचे हाल, अनेकांची बलिदाने आहेत. त्यातील काही डोळ्यांसमोर सदैव राहतात. त्यांना प्रणाम करून आपण सर्वांच्याच त्यागाला प्रणाम करीत असतो.
भाई कोतवाल गरिबीत जन्मले, गरिबीत वाढले. मोठ्या कष्टाने त्यांनी शिक्षण घेतले. ते वकील झाले; परंतु पैसा त्यांच्या डोळ्यासमोर नव्हता. दरिद्री जनता त्यांच्या डोळ्यासमोर होती. अशावेळेस 42 चा लढा आला. 9 ऑगस्टची अमर तारीख उजाडली. 'चले जाव' शब्द आधीच उच्चारला गेला होता. त्यांच्या जोडीला 'करेंगे या मरेंगे' मंत्र आला. महात्माजींनी दिलेले हे दोन महान मंत्र आहेत. जे जे मानवतेला मारक आहे आत्मविकासाच्या आड येणारे आहे त्याला 'चले जाव म्हणायचे आणि तोंडाने केवळ न म्हणता त्यासाठी 'करेंगे या मरेंगे' या निर्धाराने धडपडायचे, सर्वस्व अवियाचे. महात्माजींचे हे दोन मंत्र घेऊन भाई कोतवाल आपल्या तालुक्यात गेले. ह्याच लढ्यात त्यांनी प्राणाहुती दिली.
त्यावेळेस लढा लढणारे बाहेरचे मंडळ होते. ठायी ठायी टापू अहिंसक रीतीने म्हणजे कोणाचे प्राण न घेता स्वतंत्र करायचे आणि अशा रीतीने सत्वतंत्र टापू वाढवित जायचे. या स्वतंत्र प्रदेशाला मग मात्र परसत्तेशी सशस्त्र लढा करायला काँग्रेसच्या धोरणानुसार प्रतिबंध करायचा नाही असेही ठरले होते: कारण काँग्रेसही स्वातंत्र्य मिळाल्यावर हाती शस्त्र घेऊन लढणारच होती. भाई कोतवालांनी कर्जत तालुका स्वतंत्र म्हणून जाहीर केला. माझ्या स्वतंत्र तालुक्यात ब्रिटिश सत्तेचे पोलीस नकोत. त्यांनी व त्यांच्या मित्रांनी पोलिसांची हत्यारे लांबविली. पोलिसांना हात नाही लावला; परंतु ब्रिटिश सत्ता हे थोडेच सहन करणार? लष्कर धुमाकूळ करीत आले. भाई कोतवाल हे सिद्धगड किल्ल्यावर होते. पुणे, कुलाबा, ठाणे, तिन्ही जिल्ह्यांचा हा किल्ला म्हणजे किल्ली; परंतु फितुर माणसाने पत्ता दिला. रात्री बॅटयांचा प्रकाश पाडीत हॉल साहेब व सैनिक, पोलीस निघाले. भाई कोतवाल निजलेले होते. पहारेकरी होता. गोमा पाटील यांचा तो मुलगा. हिराजी त्याचे नाव. नावाप्रमाणे तळपता हिरा होता. त्याला गोळी लागली. भाई कोतवाल उठले. त्यांनी बंदूक घेतली; परंतु त्यांनाही गोळी लागली. तरीही ते निसटून जाऊ पाहत होते; परंतु अशक्य झाले. इतरांना म्हणाले, "तुम्ही शक्य तर निसटा. जा." काही पकडले गेले.
काही निसटले. भाई कोतवालांनी स्वातंत्र्याच्या सिद्धीसाठी सिद्धगडावर प्राण ठेवले. गोमा पाटील वगैरेंना पुढे शिक्षा झाल्या. पुढे सारे सुटले तेव्हा गोमा पाटील सुटले. सिद्धगड हे तीर्थक्षेत्र आहे. जनतेने तेथे स्तंभ उभारला आहे; परंतु हुतात्मा कोतवाल यांचे स्मारक हृदयहृदयात हवे. गरीब जनता जोवर सुखी नाही तोवर विसावा नाही घेता कामा. सुखाने राहता नाही कामा.
COMMENTS