Essay on C Rajagopalachari in Marathi : या लेखात आम्ही तुम्हाला सी. राजगोपालाचारी यांच्यावरील निबंध आणि स्वातंत्र्य चळवळीतील राजगोपालाचारींचे योगदान य
Essay on C Rajagopalachari in Marathi : या लेखात आम्ही तुम्हाला सी. राजगोपालाचारी यांच्यावरील निबंध आणि स्वातंत्र्य चळवळीतील राजगोपालाचारींचे योगदान याबद्दल सांगत आहोत. C Rajagopalachari Information in Marathi.
सी. राजगोपालचारी (राजाजी) मराठी माहिती निबंध - Essay on C Rajagopalachari in Marathi
गांधीजींचा शब्द प्रमाण मानून विधायक कार्यावर भर देणारा निष्काम कर्मयोगी. ब्रिटिशकालीन हिंदुस्थानात प्रथम मंत्रिमंडळे आली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री व गव्हर्नर जनरल अशी पदे भूषविली होती; परंतु गर्वाचा लवलेशही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नव्हता. 'चलेजाव'चा लढा त्यांना पसंत नव्हता म्हणून ते त्या लढ्यात सामील झाले नाहीत.
सी. राजगोपालचारी (राजाजी) मराठी निबंध - 9 डिसेंबरला राजाजीचा वाढदिवस होता. भारत स्वतंत्र झाल्यावर ते गव्हर्नर जनरल होते. महात्माजींनी हिंदुस्थानच्या राजकारणात नवयुग आणले. जसे पंडित मोतीलाल, दे. दास त्यांना मिळाले. त्याचप्रमाणे राजाजी. परंतु देशबंधू व मोतीलाल यांनी पुढे स्वराज्य पक्ष काढला तसे राजाजींनी केले नाही. गांधीजी त्या वेळेस तुरुंगात होते. राजाजी विधायक कार्यावर भर देत राहिले. गांधीजींचा शब्द त्यांना प्रमाण वाटे. खादीच्या कार्यात त्यांनी चैतन्य ओतले. त्यांनी आश्रम काढला. संघटनेचे जाळे विणले. 1934 नंतर कायदेमंडळाचे युग येऊ लागले. 34 च्या मुंबईच्या काँग्रेसमध्ये महात्माजी अधिकृतपणे काँग्रेसपासून दूर झाले. त्यावेळी राजाजी म्हणाले, "महात्माजींचा काँग्रेसमधील प्रवेश जेवढा भव्य, तितकेच त्यांचे आज दूर होणेही भव्य आहे." प्रथम मंत्रिमंडळे आली. राजाजी मुख्यमंत्री झाले. ते लेचेपेचे नव्हते. एकदा काँग्रेसच्या आमदारांना जमवून म्हणाले, “मी असे कर्जबिल आणणार आहे. तुम्हाला संमत नसेल तर हा माझा राजीनामा घ्या." असे निर्भयपणे आमदारांना सांगणारे ते होते.
मद्रासभर त्यांनी हिंदीप्रचारास कायद्याने जोर दिला. शाळांतून हिंदी ठेवण्यात आली. त्यांना विरोध झाला, त्यांनी जुमानला नाही. दारूबंदीसही केवढी चालना त्यांनी दिली! स्वतः प्रचारार्थ जात. गावोगावच्या मायबहिणी त्यांना ओवाळीत; कारण दारुबंदी झाली तर मायबहिणींचे संसार सुखाचे होणार होते.
राजाजी सुंदर सोपे बोलतात. ते वादविवादपटू आहेत. प्रतिपक्षाची उपहासगर्भ टिंगल करतात. त्रिपुरा काँग्रेसच्या वेळेस प्रदर्शन मंडपातील भाषणात म्हणाले, “गांधीजींचे नेतृत्व तुम्हाला तारील. ही नौका सुरक्षित नेईल. भोके पडलेल्या दुसऱ्या नौकांत बसू नका. फसाल." मद्रासकडील निवडणुकीच्या दौऱ्यांत ते नेहमी हनुमानाचा आदर्श ठेवा म्हणायचे. निवडणुकीच्या फलकांवर हनुमानाचे चित्र असायचे. हनुमान म्हणजे निर्धार नि निष्ठा. रामाला हनुमान, तसे तुम्ही महात्माजींना व्हा, काँग्रेसला व्हा-असे ते सांगत.
परंतु ते महात्माजींचे एकनिष्ठ अनुयायी असले तरी आंधळे भक्त नव्हते. चले जावचा लढा त्यांना पसंत नव्हता, ते त्या लढ्यात सामील झाले नाहीत. जीनांजवळ तडजोड व्हावी म्हणून ते खटपट करीतच होते. काहीतरी करून शांततेने देशाचा प्रश्न सुटावा असे त्यांना वाटे. त्यांची टिंगल झाली. मुंबईत त्यांच्यावर डांबर उडवण्यात आले. सिमल्याला जोडे फेकण्यात आले; परंतु अशाने भिणारे ते नव्हते. सर्वांचा विरोध सहन करून ते स्वत:ची मते प्रतिपादित राहिले. त्यावेळेस महात्माजींचा येरवड्यास हरिजनांसाठी उपवास सुरु होता. मसुदा तयार होईना. राजाजी एकदा सरदारांना म्हणाले, "तुम्ही तरी गांधीजींना उपवास सोडायला सांगा." सरदार म्हणाले, "त्यांच्याहून अधिक पवित्र नि विशुद्ध आत्मा मी पाहिला नाही. मी त्यांना काय सांगणार?"
राजाजी अति साधे आहेत. मद्रासचे गव्हर्नर होते. तरी स्वत: हाताने धोतर धुवायचे! आजही धूत असतील, तोच वेष. तीच राहणी-तुरुंगात एका बादलीभर पाण्यात सारे आटपायचे. ते पहाटे 5 ला उठत. उठतात, प्रार्थना म्हणतात. गीता, उपनिषदे यांचे भक्त. तुरुंगात गीतेवर प्रवचनं द्यायचे. त्यांनी तामीळ भाषेत गोष्टी लिहिल्या आहेत. हिंदीत त्यांचा अनुवाद झाला आहे. साधे संदर लिहिणे, जेलमध्ये स्वत:चे फाटके कपडे शिवायचे, इतर राजबंदीही त्यांच्याजवळ स्वत:चे फाटलेले कपडे आणायचे आणि राजाजी शांतपणे शिवायचे.
त्यांना अभिमान नाही. सेवाग्रामला गेले तेव्हा म्हणाले, "मी गव्हर्नर जनरल आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ इतकाच की, कोणाही हिंदी माणसाला आता ग. जनरल करु शकाल. माझ्यासमोर ही मुले आहेत. यांच्यातीलही कोणी उद्या होईल." गव्हर्नर जनरल असोत किंवा कोठे आश्रमात असोत. त्यांचे जीवन एकरूपच आहे.
मागे मद्रासला गेले तेव्हा म्हणाले, “आपल्या प्रांतातला हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ अधिकारी बनला या दृष्टीने माझ्याकडे नका बघू. एका मद्राशाला मान मिळाला ही दृष्टी नको." ते आज परित्यक्त झाले आहेत. 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' हे आता त्यांचे काम. त्यांच्याजवळ द्वेषमत्सर जणू उरले नाहीत असे वाटते. गोड मुरांबा व्हावा तसे ते झाले आहेत. जपून चला असे सर्वांना सांगतात. देशाला मोठे करा सांगतात.
सेवाग्रामला म्हणाले, “मृताची इच्छा राहिली तर त्याच्या आत्म्यास शांती नसते. गांधीजींना व्यक्तिगत इच्छा नव्हती. या देशावर त्यांचे फार प्रेम. येथील प्रत्येक व्यक्ती उद्योगी नि सच्छील होईपर्यंत महात्माजींच्या आत्म्याला कोठली शांती?" मागे एकदा म्हणाले, "महात्माजी ही देवाने भारताला दिलेली थोर देणगी आहे. तुम्हा आम्हाला मोठ्या भाग्याने मिळाली; परंतु त्या देणगीला आपण पात्र आहोत की नाही, हरी जाणे."
राजाजींची मुलगी गांधीजींच्या देवदासांना दिलेली. ते गांधीजींचे आप्त झाले; परंतु हदयाने आधीच एकरूप झालेले होते. भारतीय तरुणांनी अशा या थोर सेवकापासून अपार काम करण्याची, आपल्या बुद्धीस पटेल त्याला निर्भयपणे चिकटून राहण्याची, साधेपणाने जगण्याची स्फूर्ती घ्यावी.
COMMENTS