Essay on Leisure time in Marathi Language : In this article " मोकळा वेळ, फुरसतीचा वेळ मराठी निबंध ", " फुरसतीचा वेळ कसा वापरा...
Essay on Leisure time in Marathi Language: In this article "मोकळा वेळ, फुरसतीचा वेळ मराठी निबंध", "फुरसतीचा वेळ कसा वापरायचा मराठी माहिती" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Leisure time", "मोकळा वेळ, फुरसतीचा वेळ मराठी निबंध for Students
एखाद्या गोष्टीची आवड असली की, त्यासाठी सवड काढता येते, असे म्हणतात; पण पुष्कळदा आपल्याला मोकळा वेळ असतो, सवड असते आणि या वेळेमध्ये काय करावे असाही प्रश्न पडतो. सामान्यत: आपले दिवसाचे काम ठरलेले असते. ठराविक कामेच आपण वर्षानुवर्षे करीत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तेच ते, तेच ते' अशा कामांत निरर्थकता जाणवू लागते; शारीरिक थकवा वाढत जातो. यंत्रवत कामे करीत राहून आपणच एक यंत्र बनून जातो. मनाला आलेला थकवा घालविण्यासाठी कुणी मग दूरदर्शनचा पडदा जवळ करतो, कुणी फिरायला, सहलीला जाऊन कंटाळा घालवू बघतो, क्लबवर जाऊन पत्ते कुटण्यात कुणी आनंद मिळवितो, तर कुणी मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ घालवितात. पण हा एक प्रकारे मोकळ्या वेळेचा उपयोग असला व त्यामुळे रूटिन व्यवहारात गुंतून येणारा थकवा दूर होत असला, तरी आयुष्यात मोकळ्या वेळेचा एवढाच उपयोग नाही. मोकळ्या वेळेचा यापेक्षाही अधिक चांगला व आपल्या कलागुणांना वाव देणारा व सर्जनशक्तीला प्रोत्साहन देणारा उपयोग आपण करू शकतो. नव्हे, तसा करणे हाच मोकळा वेळ सत्कारणी लावणारा उपयोग होय.
आपल्या आवडीच्या उद्योगात रमणे किंवा आपल्या प्रिय व्यक्तींच्या सहवासात घालवायला वेळ मिळणे याचा आनंद प्रत्येकालाच होत असतो. अशा वेळीही आपण कुठले ना कुठले काम करीतच असतो; पण हे काम आपणच निवडलेले असल्याने त्याचा शीण येत नाही; आणि शारीरिक शीण जाणवला तरी मनाला त्यापासून खूप उभारी मिळालेली असते. आपले रोजचे कामाचे जोखड पेलायला हुरूप आलेला असतो. मुंबईसारख्या क्षणाक्षणाला कामाचा ताळेबंद ठेवणाऱ्या कॉस्मॉपॉलिटन शहरांमध्ये तर असे दुर्मिळ आनंदाचे क्षण माणसे एखाद्या दुर्मिळ रत्नासारखे जपून ठेवीत असतात आणि अशा मोकळ्या वेळेतच माणसाचे माणूसपण, त्याची कलासक्ती, त्याच्या ठिकाणची निसर्ग-सहवासाची ओढ अत्यंत मोकळेपणाने व कोणतेही व्यावहारिक हिशेब न करता व्यक्त होत असते. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, मोकळा वेळ म्हणजे मोकळ्या हवेमध्ये मनमुराद श्वासोच्छ्वास करण्याने मिळणारी अमर्याद ऊर्जा होय आणि अशा मुक्ततेतच आपल्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ उलगडू शकतो.
आज मध्यमवर्गीय माणूस 'बौद्धिक कामां'त किंवा 'टेबलवर्क'मध्ये गुंतलेला असतो. कामगार किंवा कष्टकरी व शेतकरी यांचे आयुष्य शारीरिक कष्ट उपसण्यात खर्च होत असते. आदिमानवाच्या काळामध्ये अशी कामाची विभागणीही माणसाला करता आलेली नव्हती. अन्नाचा शोध व संग्रह, स्वसंरक्षण यासाठी शारीरिक कष्ट व बौद्धिक पातळीवरची हुशारी या दोन्ही गोष्टी एकाच माणसाला कराव्या लागत होत्या. अशा कामांमधून तो जेव्हा आपल्या दगडी गुहेत येत असेल तेव्हा त्यास समूहात सुरक्षितपणे जगण्याचा आस्वाद घेताना विश्रांतीही मिळत असेल. त्या वेळी त्याच्या ओठांवर गाण्याची लकेर उमटत असेल. सामूहिक नृत्यामध्ये तोही विश्रांती शोधत असेल. गुहेच्या ओबडधोबड भिंतींवर दुसऱ्या दगडाने विविध चित्राकृती काढण्यात त्याला इतर माणसे प्रोत्साहित करीत असतील. कच्चे मांस खाता खाता त्यात तिखट-मीठ-मसाला घालून, शिजवून अधिक रुचकर करण्याची कला त्याला साध्य झाली असेल. चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला, संगीतकला इत्यादी विविध कलांची दालने अशा मोकळ्या वेळेतच समृद्ध होत आलेली आहेत. अशा कलांमधूनच मानवी मन प्रकट करणाऱ्या संस्कृतीची पायाभरणी होत असते. प्रारंभीच्या कालखंडातील कलेची वाढ अशी माणसाच्या मोकळ्या वेळेच्या सदुपयोगातून झालेली आहे. ती मोकळ्या वेळेने मानवी जीवनाला दिलेली देणगीच आहे, असे त्या काळच्या अनेक माहितीवजा लघुपटांतून लक्षात आलेले आहे. मोकळ्या वेळेचा असा आपल्या जीवनाशी व जीवनातील कलात्मक संस्कृतीशी जवळचा संबंध आहे.
आपल्या जीवनात असलेले कलेचे स्थान आपल्याला जाणवत नाही. बौद्धिक कामाची गरज आपल्याला पटू शकते. शारीरिक कष्टांचे मोलही आपण नाकारीत नाही; पण ते आपण करण्यापेक्षा दुसऱ्या कुणीतरी करावेत, अशी आजच्या बुद्धिजीवी माणसाची वृत्ती आहे. कुणीतरी दगडविटा वाहून आणल्याशिवाय घर बांधले जात नाही; शिकार करण्याचे, शेतात धान्य पिकविण्याचे कष्ट घेतल्याशिवाय अन्न मिळत नाही, हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण काम करता करता, गाण्याची लकेर घेतली नाही म्हणून कोणतेच कार्य अडत नाही. गुहेतील भिंतींवर चित्र न काढल्याने भिंतीचे संरक्षण-निवारा देण्याचे कार्य वाढत नसते. कोणतीही कला अशी व्यावहारिक पातळीवरचे गणित सोपे करीत नसते. म्हणूनच प्रारंभीच्या काळात कलेची जोपासना अशी मोकळ्या असलेल्या वेळेमध्ये माणसाकडून, आनंदाच्या ऊर्मीमध्ये केली गेली. त्याच्या नागरीपणाचे ते आदिम दर्शन होय.
आजच्या आधुनिक यांत्रिक युगामध्ये जीवनाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. प्राथमिक गरजांच्या मागे धावण्यात माणसाची दमछाक होत आहे. उपजीविकेसाठी काम करण्यात व उपजीविकेची साधने हस्तगत करण्यात मानवी शक्ती घड्याळाच्या काट्यांप्रमाणे सारखी धावत आहे. शिक्षणातही व्यवहारी जीवनाचा विचार करून उद्योजकता विकसित करणाऱ्या किंवा व्यावसायिक, तांत्रिक शिक्षणाकडे वाढता कल आहे. भाषा, तत्त्वज्ञान, संस्कृती इत्यादींकडे दुर्लक्ष होत आहे; त्यामुळे विज्ञानाची उपयुक्तता लहानपणापासूनच मनावर ठसत आहे. पण त्यामानाने कलेने जर अर्थार्जन होत असेल तरच कलेकडे वळण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. त्यामुळे नोकरीव्यतिरिक्त जो मोकळा वेळ माणसाला मिळत आहे, त्याचाही उपयोग केवळ आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कसा करता येईल, याचा तो विचार करू लागण्याइतका केवळ 'आर्थिक' बनला आहे. उदाहरणच द्यायचे तर, अनेक कंपन्यांमध्ये किंवा काही सरकारी कार्यालयांमध्येही सहलीला जाण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जाते व सहलीस न गेलात तर त्याची 'कॅश' घेता येते. अनेकांचा कल केवळ 'कॅश' घेण्याकडे असतो. नोकरीमधून मिळालेला हा मोकळा वेळही स्वत:च्या आनंदासाठी खर्च करण्याची त्यांची वृत्ती नसते.
समाजातील कष्टकरी वर्गाला कामाची ओझी वाहता वाहता मनाला हुरूप देणारा मोकळा वेळच उरलेला नाही; त्यामुळे थकलेल्या शरीरास व मनाला उभारी आणण्यासाठी ते गुंडगिरी व व्यसनाधीनता यांचा आश्रय घेऊ लागले आहेत. समाजात वाढत चाललेल्या चंगळवादी वृत्तीला कितीही पैसा मिळविला तरीही जीवनगरजा पुरवायला अपुराच ठरत आहे. अधिकाधिक पैसा व जास्तीत जास्त सत्ताकेंद्रे ताब्यात आणण्यात समाजातील सर्व थरांतील माणसे गुंतलेली आहेत. त्यांना मोकळा वेळ या दोन्ही कामांपेक्षा इतर कोणत्याही समाजोपयोगी किंवा कलात्मक कार्यासाठी खर्च करण्यात रस वाटत नाही. आपला मोकळा वेळ अर्थार्जनाची गरज भागविण्यात खर्च करण्यापेक्षा आपल्या आवडीचा उद्योग करण्यात रमणे हे महत्त्वाचे आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. लेखन, वाचन, संगीतादी कलांच्या क्षेत्रातील ज्ञान वाढविणे, विविध कलांची प्रदर्शने पाहणे, ऐतिहासिक व निसर्गरम्य स्थळांच्या सहली काढणे, बागकाम अशा अनेक उद्योगांत हा मोकळा वेळ सार्थकी लावता येईल. ज्यांच्याजवळ धन, वेळ व धाडस आहे त्यांनी नाटके बसविणे, चित्रपटनिर्मिती करणे, स्वत:मधील कलावंत घडविणे या गोष्टींकडेही त्यांना वळता येईल. समाजाचे आज जे अनेक थरांवरचे प्रश्न आहेत, त्यांपैकी एखाद्या प्रश्नाच्या कामात यथाशक्ती स्वत:ला गुंतवून घेण्याने समाजोपयोगी कार्यही आपल्या हातून घडू शकेल. कुठे अंधश्रद्धेचा अतिरेक असतो; कुठे नको तितके व्यक्तिस्वातंत्र्याचे वेड फोफावलेले असते; कुठे फॅशन्सच्या नावाखाली स्वैरवर्तन स्तुत्य मानले जाते. यांपैकी एखाद्या कामामध्ये आपण रस घेऊ शकतो. मानसिक व शारीरिक रोगांमुळे अनेक दवाखाने भरून जात आहेत. वकील व डॉक्टर्स यांच्या व्यावसायिक निष्ठाही तपासून घ्याव्या लागत आहेत. त्यातच पूर्वीची ‘फॅमिली डॉक्टर' ही कल्पना तर मोडीत निघालेली आहे. अशा वेळी सामाजिक क्षेत्रात आपल्या प्रतिष्ठेच्या व आपल्यासारख्या समानधर्मीयांच्या बळावर काही उपयुक्त कार्य आपण करू शकतो. सरकारी पातळीवरही अशी समाजोपयोगी कार्ये केली जात आहेत; पण त्यांमध्ये पुष्कळदा समजदारीचा व आत्मीयतेचा अभाव असतो. एक नोकरी म्हणून, अर्थार्जनाचे साधन म्हणून अशी कामे सरकारी वेतन घेणारी नोकरदार माणसे पार पाडीत असतात. आपण स्वत:चा मोकळा वेळ अशा कामात खर्च करताना ही दृष्टी बदलतो आणि समाजाच्या जिव्हाळ्यापोटी व आपले एक कर्तव्य म्हणून अशा कामांमध्ये आपली शक्ती खर्च करू शकतो. अशा कामांतून पैसा व प्रतिष्ठा मिळत नाही असे नाही; पण ते आपले उद्दिष्ट असता कामा नये.
अशी कामे करताना त्यांची योजनाबद्ध व पद्धतशीर आखणी करावी लागते. त्यासाठी लेखन, वाचन व जनसंपर्क असावा लागतो. धीटपणा, वक्तृत्व, श्रम घेण्याची तयारी इत्यादी अनेक विशेष त्यासाठी आपल्यामध्ये बाणवावे लागतात. कधी कधी समाजाचा विरोधही सहन करावा लागतो. पण एकदा अशा कामांची सवय लागली व अशा प्रकारच्या कामांची आवड निर्माण झाली की आपल्या जीवनाला अर्थ येतो. आपल्या हातून विधायक कामे केली जातात. स्वत:ला महार म्हटले तरी उपेक्षितांच्या जीवनात अर्थ निर्माण करण्यासाठी धडपडणारे श्री. म. माटे, महात्मा फुले, अशा कितीतरी माणसांची सार्वजनिक क्षेत्रातील कामगिरी म्हणजे एक प्रकारे त्यांच्या मोकळ्या वेळेचा त्यांनी सढळपणे केलेला सदुपयोगच होय. इतकी मोठी ताकद आपल्याजवळ नसली तरी त्या दिशेने काम करण्याची सवय आपल्याला आनंद व समाधान देते.
लहानपणापासूनच आपल्याला मिळणाऱ्या मोकळ्या वेळेचा आपण उपयोग करीतही असतो. कुणी बुद्धिबळ, कुणी क्रिकेट, कुणी टेनिस अशा खेळांमध्ये रंगतात. त्यांमध्ये प्रावीण्यही मिळवितात. कधी कधी तो त्यांचा व्यवसाय, लोकप्रियता व कीर्ती मिळवून देणारा छंदही ठरू शकतो. पण मोकळ्या वेळेचा असा उपयोग करायची सवय मोठ्यांनी छोट्यांना लावली पाहिजे किंवा आपल्याला समज आल्यावर ती आपण लावून घेतली पाहिजे. कै. यशवंतराव चव्हाणांसारख्या राजकारण-धुरंधर नेत्यालाही गाडीमधला आपला वेळ चांगलेदर्जेदार साहित्य-वाचनात व्यतीत करण्याची सवयच लागलेली होती. रामायणाच्या काळात राम-लक्ष्मणांसारख्या राजपुत्रांनाही राजकारणाव्यतिरिक्त उपयुक्त छंद जोपासण्याचे शिक्षण मिळत होते. लक्ष्मणाला झोपडी बांधण्याचे शिक्षण मिळाले होते. त्याचा त्याला वनवासात उपयोग झाला. कैकेयीसारख्या राणीला औषधांची माहिती होती. त्याचा तिला युद्धामध्ये उपयोग करता आला. औरंगजेबाने टोप्या शिवण्याची कला माहिती करून घेतली होती. ज्याला अनेक व्यवधाने असतात, जो कामामध्ये सतत गुंतलेला असतो, त्यालाच असा मोकळा वेळ काढता येतो.
आजकाल मुले केवळ दूरदर्शन पाहण्यात वेळ घालवितात. प्रौढ माणसेही आपला मोकळा वेळ करमणुकीच्या नावाखाली हेच प्रसारमाध्यम जवळ करतात. दूरदर्शन पाहू नये असे नाही; पण सगळाच मोकळा वेळ केवळ दूरदर्शन पाहण्यात घालवू नये, याची जाणीव पालकांनी तर ठेवावीच; पण आपल्या घरातील मुलांनाही याची जाणीव करून द्यावी. दूरदर्शनवरचे कार्यक्रम पाहताना तुम्ही कोणते कार्यक्रम पाहता हे महत्त्वाचे आहे. अनेक कार्यक्रम रटाळ नाचगाण्यांनी, हिंदी धर्तीच्या चित्रपटांनी, उत्तान दृश्यांनी व मारामारीच्या प्रात्यक्षिकांनी भरलेले असतात. असे कार्यक्रम पाहण्यामुळे मनाला विकृत करमणुकीची सवय लागते. पण त्याबरोबरच कला, साहित्य, नृत्य, नाट्य यांचे दर्जेदार कार्यक्रमही दूरदर्शनवरून प्रसारित होत असतात; ते पाहण्याची सवय मुलांना लावली तर त्यांचा फावल्या वेळातील उद्योग अधिक कलात्मक होऊ शकेल. असे कार्यक्रम पाहून कदाचित त्यांना अभिनयाचे, लेखनाचे मार्गदर्शनही मिळू शकेल; कारण या छोट्या पडद्याचे आकर्षण सगळ्यांनाच असल्याने तेही फावल्या वेळात चांगला उद्योग शोधून देईल. एवढ्या सखोलतेने आपण दूरदर्शनकडे पाहत नाही; त्यामुळे केवळ सवंग करमणुकीने फावला वेळ फुकट खर्च होण्याला हे दूरदर्शन कारणीभूत होत आहे.
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मोकळा वेळ कुणाला सापडत असतो? ज्याची सगळी शारीरिक ताकद रोजच्या 'Day to Day' व्यवहारातच खर्च होत असते, त्याला अशा मोकळ्या वेळेचा उपयोग करण्याचा प्रश्न फारसा सतावत नसतो; पण शारीरिक दृष्टीने सक्षम व निकोप असलेल्या व्यक्तींना खूप काही करण्याची ऊर्मी 'आतूनच' असते. अशांपैकी ज्यांच्याजवळ शारीरिक क्षमता आहे त्यांना क्रीडाक्षेत्र हाक मारत असते. विविध खेळ, मैदानात रंगणारे व जागतिक स्पर्धांमध्येही ज्यांना प्रतिष्ठा आहे असे अनेक खेळ त्यांना आनंद, शरीरसंवर्धन व प्रावीण्य देऊ शकतील. आज क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, जिम्नॅस्टिक यांसारख्या अनेक खेळांना खूप महत्त्व आलेले आहे. केवळ मोकळ्या वेळेचा सदुपयोग म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात नाही, ते 'करियर' करणाऱ्या व्यक्ती आहेत. म्हणूनच असे खेळ 'करियर' म्हणून निवडणाऱ्यांचा फावला वेळ त्यांनी कसा घालवायचा हाही प्रश्न विचारात घ्यावा लागतो. कदाचित असे उत्कृष्ट खेळाडू आपला फावला वेळ संगीत-साधना, चित्रकला, साहित्याचे वाचन यांमध्ये व्यतीत करून आपल्या मनाला अधिक उभारी आणत असतील.
'रिकामे मन हा सैतानाचा कारखाना असतो' असे म्हटले जाते. आपल्या थकल्याभागल्या मनाला कधीही असे रिकामे राहू देऊ नये, हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे. अशा मोकळ्या वेळेमध्ये माणूस नुसताच नाक्यानाक्यावर गप्पा झोडण्यात रंगतो; भारी भारी हॉटेल्समध्ये जाऊन उगाचच खर्च करण्यात मोठेपणा मानू लागतो. नाहीतर एकमेकांच्या कुचाळक्या करणे, टवाळकी करणे अशा सवयी लावून घेतो. त्यामुळे आपण आपल्यालाच विकृतीच्या वाटेने नेत असतो. मनाला काय किंवा शरीराला काय आळशी होऊ न देणे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. आयुष्य अनमोल आहे. वेळ अमोल आहे. ओंजळीतून निसटणाऱ्या पाण्याप्रमाणे तो आपल्या हातून गळून जात असतो. गेलेला क्षण परत आणता येत नाही, हे लक्षात घेऊन मोकळ्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याची सवय लहानपणापासूनच अंगवळणी पाडायला पाहिजे. झोप घेतल्याने जसे आपण रोजच्या कामाकडे उत्साहाने वळतो, तीच विश्रांती या फुरसतीच्या वेळेतील उद्योगांनी आपणाला मिळू शकते.
सारांश
लहानपणापासून आपण साचेबंद जीवन जगत असतो. बालजीवन शाळेच्या वेळापत्रकात, तरुणपण महाविद्यालयीन आखणीत व प्रौढपण नोकरीच्या वेळापत्रकात अडकलेले! हे सगळे जीवनाचे वेळापत्रक दुसऱ्या कुणीतरी आपल्या हातात दिलेले असते. त्यातून मिळणारा मोकळा वेळ मात्र आपण आपले वेळापत्रक आखून घालवायचा असतो. हा खास आपला असलेला वेळ कसा घालवायचा, याची योजनाबद्ध आखणी करण्याची सवय फुरसतीच्या वेळेचा सदुपयोग करण्यामुळे लागते. पुढे निवृत्तीच्या वयामध्ये स्वत:च्या वेळेचे वेळापत्रक ठरविण्याची सवय उपयुक्त ठरते; आणि मोकळ्या वेळात अनेक उपयुक्त, समाजोपयोगी व कलापूर्ण कामात आपला वेळ चांगला घालविता येतो.
COMMENTS