Essay on Earth Day Celebration in Marathi : In this article " वसुंधरा दिन कार्यक्रम मराठी निबंध ", " 22 एप्रिल जागतिक पृथ्वी ...
Essay on Earth Day Celebration in Marathi: In this article "वसुंधरा दिन कार्यक्रम मराठी निबंध", "22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिन मराठी निबंध" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Earth Day Celebration", "वसुंधरा दिन कार्यक्रम मराठी निबंध" for Students
"करू रक्षण पर्यावरणाचे
होईल कल्याण मानवाचे'
'झाडे लावा-निसर्ग वाचवा,'
झाडे लावा खूप, थांबेन जमिनीची धूप"।
या आणि अशा घोषणांचे फलक हातात घेऊन आम्ही विद्यार्थ्यांनी घोषणा देत शाळेच्या परिसरातून प्रभात फेरी काढली होती, निमित्त होते २२ एप्रिल अर्थात वसुंधरा दिनाचे!
मी मोठाच भाग्यवान! माझ्या शाळेमध्ये वर्षभर इतके उपक्रम होत असतात आणि आम्हा विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होता येते याच्यासारखा दुसरा आनंद तो कोणता?
अगदी जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासून पालखी सोहळा, गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन, हिंदी दिन, विज्ञान दिन, भूगोल दिन, पर्यावरण दिन अशा विविध दिनांचे औचित्य साधत त्या त्या दिवसांचे महत्त्व आम्हा विद्यार्थ्यांना समजावले जाते.
निसर्गाने नटविलेल्या या जगात माणसाने घरे बांधली. स्वतःची वेगळी प्रतिसृष्टी निर्माण केली. स्वतःच्या बुद्धी आणि कार्यक्षमतेच्या बळावर माणूस निसर्गाचा स्वामी झाल्यासारखे वागू लागला.
अहंकारी मानवाने अविचाराने निसर्गाचे शोषण सुरूच ठेवले आणि त्यातूनच एका भीषण शोकांतिकेस सुरुवात झाली.
शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या हातात घोषवाक्यांचे फलक होते तर काही विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशात आपल्या हातात विविध झाडांची रोपे घेऊन त्या वृक्षदिंडीत सामील झाली होती.
इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी तर चक्क एक पालखी सुशोभित करून त्यामध्ये काही छोटी-छोटी रोपे ठेवली होती. रस्त्याने येणारी-जाणारी माणसे मोठ्या कौतुकाने आमच्याकडे पाहत होती.
परिसरातून फेरी मारून आल्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ती रोपे शाळेच्या आवारात एका बाजूला ठेवली. कारण आता मा. मुख्याध्यापक आपले विचार आम्हा विद्यार्थ्यांसमोर मांडणार होते.
व्यासपीठावर मा. मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. मा. मुख्याध्यापक 'वसुंधरा दिन' का साजरा करायचा, हे सांगण्यासाठी उठले. ते म्हणाले, “वाढत्या शहरीकरणाचा आणि औद्योगिकीकरणाचा सर्वाधिक परिणाम आपल्यावर होतोय तसाच तो निसर्गावरही होतोय.
नापीक जमीन, अशुद्ध हवा, दूषित पाणी, भरमसाट कचरा, सिमेंट काँक्रिटची जंगले, कारखान्यांची बजबजपुरी, वाहनांचा सुळसुळाट, विषारी वायू, आवाजांचा कलकलाट या सर्व गोष्टींनी व्यापलेले हे जग नव्या पिढींना कसे जगू देणार? ।
पण अजूनही वेळ गेलेली नाही. आपली भूमी, हवा, पाणी, वनश्री आणि साधनसंपत्ती या सर्वांचे आपण काळजीपूर्वक जतन आणि संवर्धन करणे आपल्याच हातात आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच स्वतःपासून सुरुवात करायची आहे.
झाडे नाहीत म्हणून पाऊस नाही आणि पाऊस नाही म्हणून झाडे नाहीत, हे दुष्टचक्र आपणच थांबवायला हवे."
मा. मुख्याध्यापकांच्या प्रभावी विचारांनी आम्ही सारेच अंतर्मुख झालो होतो. खरं तर मी भाषण करणार नव्हतो; पण मलाही माझ्या वर्ग मित्र-मैत्रिणींना काही सांगावंसं वाटलं, अगदी उत्स्फूर्त!
मा. मुख्याध्यापकांच्या परवानगीने मी बोलायला सुरुवात केली.
'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' असं संत तुकाराम महाराजांनी लिहूनच ठेवलंय.
विविधतेने नटलेल्या आपल्या देशात गंगा, ब्रह्मपुत्रा या महानदयांना दरवर्षी पूर येण्याचं कारण नदीच्या काठांवरची बेसुमार जंगलतोड हेच आहे.
आपल्या आजोबा-पणजोबांनी आंबा-फणसाची झाडे लावली म्हणून आज आपण त्या फळांची गोडी चाखू शकतोय.
आपल्याला थोड्याफार प्रमाणात तरी शुद्ध हवा, फळे, नद्यांचे पाणी मिळते आहे; पण येणाऱ्या पिढीचं काय?
आज आपल्याला 'चिमणी दिन'ही साजरा करावा लागतोय. समस्त चिमण्यांचं अस्तित्वच धोक्यात आलंय. तीच गत प्राण्यांची!
आज वसुंधरा दिनाच्या निमित्ताने 'जगा आणि जगू दया' हाच संदेश आपल्याला एकमेकांना देता येईल.
आपले सगळे सण निसर्गाशी जोडलेले आहेत. गुढीपाडव्याला कडुनिंब, वटपौर्णिमेला वडाची पूजा, गणेशोत्सवात दुर्वा, विविध पत्री, शुभकार्यात आंब्याची पाने, विड्याची पाने, केळीची पाने हजेरी लावतात ना!
तर मित्रांनो, मानवाचे जीवन सुकर करणाऱ्या वृक्षांची बेछूट कत्तल थांबवून आपण समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाची शपथ घेऊया."
माझे विचार अक्षरशः धावत सुटले होते. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मी भानावर आलो.
शाळेच्या आवारात आदल्याच दिवशी वृक्षारोपणासाठी खड्डे करून ठेवले होते. त्यानंतर शाळेतील अभ्यास, खेळ, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वाजतगाजत आणलेल्या रोपांचे पुनर्रोपण केले. त्या रोपांची काळजी घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्यावर सोपवण्यात आली. कारण नुसते रोपे लावून भागत नाही, तर त्यांची काळजी घेऊन ते नीट वाढवावेही लागतात ना!
आणि हो, माझ्या उत्स्फूर्त भाषणावर खूश होऊन मा. मुख्याध्यापकांनी मलाही एक रोप लावण्याची संधी आणि ते वाढवण्याची जबाबदारी दिली, तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेना!
खूपच छान माहिती thank you for sharing हे पण वाचा > वसुंधरा दिवस भाषण निबंध मराठी मध्ये माहिती !
ReplyDelete