Essay on Religion in Marathi Language : In this article " धर्म म्हणजे काय मराठी निबंध ", " धर्मातरामागील तात्त्विकता व वास्तव...
Essay on Religion in Marathi Language: In this article "धर्म म्हणजे काय मराठी निबंध", "धर्मातरामागील तात्त्विकता व वास्तवता मराठी निबंध", "धर्माची माहिती मराठी निबंध", "what is religion in marathi" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Religion", "धर्म म्हणजे काय मराठी निबंध", "What is Religion Marathi Nibandh" for Students
सर्व धर्म हे समान असतात, मानवतावादी असतात. सर्व धर्मांची मूळ शिकवण मानवतेच्या पायावर आधारलेली असते; तरीही धर्मांतरे होतच असतात, केली जातात. कधी त्यात सक्तीचा भाग असतो, कधी एखादा हेतू धरून जाणीवपूर्वक धर्मांतरे होत असतात; तर कधी केवळ एखाद्या धर्माची शिकवण अधिक मानवतावादी वाटल्यानेही धर्मांतरे झालेली आहेत. आज मात्र खुशीने झालेल्या धर्मांतरापेक्षा सक्तीने झालेल्या धर्मातराची व तीही सामूहिक पातळीवरची उदाहरणे ख्रिश्चन वा मुस्लिम धर्मांतराच्या निमित्ताने आपल्यासमोर अधिक आहेत. या हिंदू, वैदिक, बौद्ध, जैन, वारकरी, सूफी, वीरशैव, मुस्लिम, ख्रिश्चन, प्रॉटेस्टंट ख्रिश्चन व कॅथॉलिक ख्रिश्चन इत्यादी छोट्या-मोठ्या पातळ्यांवरच्या संप्रदायांची, पंथांची किंवा धर्मांची धर्मातराची उदाहरणे काय सांगतात? अशी धर्मांतरे होण्यामागची कारणमीमांसा कोणती? जगाच्या अनादिकालापासून होत असलेल्या धर्मांतरामागे तीच समान कारणे आहेत काय?
औरंगजेबाने कैद केलेल्या मराठ्यांचा राजा संभाजीमहाराजांना "धर्मातर करशील तर तुला जीवदान देतो", असे आमिष दाखवले होते. त्यावर संभाजीमहाराजांनी “तुझ्या कन्येशी निकाह लावून देत असशील, तर मी मुस्लिम धर्माचा स्वीकार करायला तयार आहे" असे तितकेच बाणेदार उत्तर देऊन धर्मातरापेक्षा वीराचे, हौतात्म्याचे मरण पत्करले. यावरून सामान्यतः प्रत्येकाला आपला जन्मदत्त धर्म प्रिय असतो व सामान्यतः व्यक्ती आपला धर्म बदलायला तयार नसते.
धर्म म्हणजे काय? 'धारयति इति धर्मः ।।' असे म्हटले जात असले व त्याच अर्थाने 'स्वधर्मे निधनं श्रेयः। परधर्मो भयावहः ।' असे म्हटले जात असले तरी धर्मांतराममध्ये हा व्यापक अर्थ अभिप्रेत नाही. हिंद, ख्रिश्चन, मुस्लिम इत्यादी अर्थाने धर्मांतरामध्ये धर्म ही कल्पना स्वीकारलेली आहे. जन्माला येणारे बालक वर उल्लेख केलेल्या कोणत्या तरी धर्माचे म्हणून जन्माला येत असते. ते मानवाचे मूल असल्याने मानवताधर्माचे विशेष ते घेऊन आलेले असले तरी त्याच्या वडिलांची जात, वडिलांचा धर्म हा त्याचा धर्म म्हणून समजला जातो. हा धर्म त्याने जाणीवपूर्वक स्वीकारलेला नसतो, तर त्याला तो जन्मजात मिळालेला असतो. काही काळाने आपल्या या धर्माचे स्वरूप त्याला कळू लागते व त्यामध्ये त्याबद्दलच्या अभिमानाची कडवी जाणीव निर्माण होते आणि मग आपल्या धर्माच्या कट्टर अभिमानातून तो इतरांना व इतर धर्माच्या समूहांना आपल्या धर्मात ओढून आणण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी याच्या उलटही घडते. त्याला आपल्या जन्मदत्त धर्मामधील त्रुटी किंवा उणिवा दिसू लागतात. त्या दूर करण्यासाठी तो नवा पंथ, नवा संप्रदाय, नवा धर्म स्थापन करू पाहतो किंवा रूढ धर्मापेक्षा एखाद्या इतर धर्माचा अंगीकार करतो. पारतंत्र्याच्या काळामध्ये रेव्ह. ना. वा. टिळकांसारख्या कविहृदयाच्या व्यक्तीला वैदिक-हिंदु धर्मापेक्षा ख्रिश्चन धर्मातील मानवतेवर आधारलेली तत्त्वे अधिक चांगली वाटली आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.
कोणत्याही धर्मामध्ये विचार व आचार हे दोन घटक असतात. पुष्कळदा वैचारिक पातळीवर हे धर्म समान तत्त्वावर आधारलेले असतात. बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार व व्यावहारिक पातळीवर हा आचारधर्म बदलता असण्याची गरज असते. असा बदल जेव्हा केला जात नाही तेव्हा त्या धर्मातील तत्त्वविचारांना जुनेपणा येतो. तो धर्म आचारधर्माच्या पातळीवर जुनाट ठरू लागतो. अशा वेळी जुन्याच धर्मामध्ये डागडुजी करून नवा पंथ व नवा संप्रदाय जुन्याशी संघर्ष करीत उभा राहतो. वैदिक धर्मातील तत्त्वांना-विचारांना विरोध करीत करुणेवर आधारलेला बौद्ध धर्म काय किंवा 'अहिंसा परमो धर्मः ।' असे अहिंसेला महत्त्व देऊन वैदिक धर्माला विरोध करीत आलेला जैन धर्म काय, ही धर्मातराचीच रूपे आहेत. याच बौद्ध व जैन धर्मातील तत्त्वांशी समन्वय साधत प्राचीन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणाऱ्या आदि शंकराचार्यांनी प्रस्थापित केलेला वैदिक धर्मही कात टाकलेले धर्मातरच ठरते. वैदिक धर्मातील समन्वयाचे तत्त्व इतके व्यापक होऊ शकते की, बौद्ध धर्माच्या संस्थापकाचा गौतम बुद्धाचाच समावेश त्याने विष्णूच्या दहाव्या अवतारामध्ये करून टाकला! भारतासारख्या महाकाय देशात अनेक धर्म आहेत. प्राचीन काळापासून ते थेट आजतागायत हे विविध धर्म भारतभूमी ही आपली जन्मभूमी मानत आलेले आहेत. आर्य भारतात येण्याच्या पूर्वीही इथे अनेक धर्माचे सुसंस्कृत लोक नांदत होते. आर्यांनी भारतात प्रवेश केल्यावर रोटी-बेटी व्यवहाराच्या मार्गाने, येथील प्रस्थापित अन्य धर्मीयांशी संपर्क ठेवला. केवळ जित-जेते अशा संबंधापेक्षाही नाइलाजाने का होईना, पण परकीयांच्या- देशवासीयांच्या अनेक धार्मिक- सामाजिक गोष्टींचा त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकार केला. अनार्यांचा जातिसंस्थेमध्ये केलेला समा.वेश किंवा त्यांच्या शंकरासारख्या दैवताचा 'रुद्र' स्वरूपात केलेला स्वीकार, ही त्यांपैकी काही उदाहरणे म्हणता येतील. 'रामायण' हे महाकाव्य तर आर्यांच्या दक्षिणेतील प्रवेशाची व दिग्विजयाची गाथा म्हटली जाते. राम-लक्ष्मणाच्या रूपाने दक्षिणेत वनवासाचे निमित्त करून आलेल्या क्षत्रियांनी वानरादी अनेक जातींचे सहकार्य घेऊन द्रविडांच्या/राक्षसांच्या रावणाच्या सत्तेचा पराभव केला. पण इथेही हे क्षत्रिय येण्यापूर्वी अगस्तींसारखे अनेक ऋषिमुनी येऊन त्यांनी आपल्या मिशनरी वृत्तीने अनार्यांची मते आर्य धर्माकडे वळवून घेतली होती. क्षत्रियांच्या पूर्वी आलेल्या ऋषींचे हे कार्य धर्मप्रसाराचेच आहे, हे आज मान्य झाले आहे. आधी मिशनरी पाठवून जनमत अनुकूल करून घ्यायचे आणि नंतर क्षत्रियांनी येऊन प्रदेश जिंकायचा, ही धर्मांतराची नीतीही धर्मांतराच्या प्रवृत्तीइतकीच पुरातन आहे. भारतासारख्या अवाढव्य देशामधील अनेक पंथ, अनेक संप्रदाय यांचा समन्वय साधणे वैदिक धर्माला जमल्याने हा धर्म अनेक धर्मांतरांना आपल्या उदरात सामावून घेऊ शकला. युद्धामधील अपरिमित हिंसा पाहून उपरती होऊन ज्या सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा अंगीकार केला, त्याचेच चक्र भारताच्या ध्वजावर मानाने स्वीकारले गेले आहे. यावरूनच भारताची सर्व धर्माकडे व धर्मातराच्या प्रक्रियेकडे बघण्याची भूमिका स्पष्ट होते..
बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने भारताबाहेर चीन, जपान, लंका अशा अनेक ठिकाणी आपले नातेवाईक धर्मप्रचारक म्हणून पाठविले. यावरून बौद्ध धर्माचा स्वीकार करताना त्याची बौद्ध धर्माबद्दलची जाज्वल्य निष्ठा प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. जैन धर्म काय किंवा बौद्ध धर्म काय यांचा स्वीकार प्रथमतः जेव्हा एखादा सत्ताधीश किंवा राज्यकर्ता करतो तेव्हा आपोआपच त्याच्या प्रजेतील बहुसंख्याकांचा कल त्या धर्मामध्ये प्रवेश करण्याकडे वळलेला दिसून येतो. धर्मातराच्या संदर्भात 'यथा राजा तथा प्रजा' हा नियम पूर्वी दिसत होता असे नसून मुस्लिमांच्या व ख्रिश्चनांच्या राजवटीतही हाच नियम पाळलेला दिसून येतो. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील मुस्लिम राजसत्तेच्या कारकिर्दीत धर्मांतर होऊनही काही प्रदेशांत व काही पंथांच्या संदर्भात परस्पर देवाणघेवाण थांबलेली नाही असेही चित्र असते. मुस्लिमांचा सूफी पंथ व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय यांच्या विचारांमध्येच नुसते आदानप्रदान होऊन थांबले नाही तर शेखमहंमदासारखे सूफी पंथाचे संत हे वारकरी संप्रदायात प्रवेश करू लागले. धर्मातरातील कडवेपणा किंवा कट्टरपणा अशा काही ठिकाणी कमी झालेला दिसतो.
भारतामध्ये जन्मलेला बौद्ध धर्म आज तरी भारताबाहेरच अधिक प्रभावी झालेला दिसतो. तसेच भारतातील वैदिक धर्माच्या प्रसाराची कक्षा इंडोनेशियासारख्या देशात आजही त्यांच्या नृत्यशैलीद्वारा जाणवत आलेली आहे. मात्र भारतातील बौद्ध, जैन, महानुभाव, शैव, वैष्णव यांसारख्या धर्मामध्ये किंवा संप्रदायांमध्ये एकमेकांपेक्षा भिन्न आचार-विचार आहेत; पण तरीही सामान्यतः ते आपला समावेश हिंदू म्हणून करतात. बाराव्या शतकाच्या आसपास भारतात असे अनेक संप्रदाय उदयाला आलेले दिसतात. काहींमध्ये तर पुनरुज्जीवन झालेले दिसते. दक्षिणेकडे वीरशैव पंथामध्ये बसवेश्वरांनी सामाजिक क्रांतीची दृष्टी ठेवून बदल केला. जातिजातींमधील विषमता जैं महानुभाव, वारकरी, नाथ, दत्त, समर्थ असे छोटेमोठे अनेक संप्रदाय सामाजिक पातळीवरील समानतेसाठी निर्माण झाले आणि महाराष्ट्रातील लोकांनी त्यांचा स्वीकार केला. या अशा पंथ-संप्रदाय बदलांनी धर्मांतराएवढे महत्त्व दिले जात नसले तरी एक प्रकारे त्यांची बैठक वैचारिक पातळीवरची होती आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील अन्यायांचा प्रतिकार करण्यासाठी मराठी माणसांनी आपला जन्मदत्त धर्म सोडून हे पंथ अंगीकारले होते. या पंथांचा किंवा धर्माचा अंगीकार करण्यासाठी त्यांच्यावर कोणीही सक्ती केली नव्हती, जुलूम-जबरदस्तीचा भाग त्यामध्ये नव्हता. वारकरी संप्रदायाचा अंगीकार करूनही ते आपले जातिविशिष्ट आचार-चालीरीतींचे पालन करू शकत होते. आपल्यावर विशिष्ट जातीमुळे होणारा अन्याय दूर करण्याचा त्यांचा मर्यादित पातळीवरचा प्रयत्न वारकरी संप्रदायांच्या स्वीकारामागे होता.
आज पददलित समाजातील बहुसंख्य समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. त्यामागचा हेतूही सामाजिक पातळीवरील अन्यायाचा संघटितपणे प्रतिकार करण्याचाच आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावहारिक इत्यादी सर्वच क्षेत्रांत त्यांना समानतेची वागणूक मिळावी हा त्यांचा धर्मांतरापाठीमागचा हेतू आहे. लौकिक, पारलौकिक, आध्यात्मिक, आधिभौतिक, आर्थिक, व्यावहारिक, सांस्कृतिक वा सामाजिक विकासासाठी जेव्हा मूळ धर्मामध्ये अडचणी येतात, अडथळे निर्माण होतात तेव्हा धर्मांतराकडे वळण्याची प्रवृत्ती बळावते. धर्मांतराने हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन धर्माचे प्रवक्ते किंवा मिशनरी देतात. अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी-धंदा इत्यादी गोष्टींची आमिषे दाखविली जातात; पण धर्मांतरे केल्यानंतर यांपैकी कोणत्याही पातळीवर हाती काहीच लागलेले नाही, असेही पुष्कळांच्या निदर्शनाला येते.
जवळचे उदाहरण म्हणून ख्रिश्चन मिशनरीचे सांगता येईल. ब्रिटिशांचे राज्य येण्याच्या कितीतरी पूर्वी हे मिशनरी भारतात आलेले आहेत. पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन, इंग्रज इत्यादी मिशनऱ्यांनी आपापल्या मार्गाने ख्रिश्चन धर्माचा प्रसार करताना त्या त्या प्रदेशातील गरीब, सालस व पापभीरू समाजाचा विश्वास संपादन केला, त्यांची भाषा शिकून घेतली; त्यांच्या अडचणी सोडविण्याचे उपाय सांगितले; मदत केली आणि एका हाताने मदत करता करता स्वधर्माकडे ओढून घेतले. एक प्रकारे भावनिक पातळीवरचे हे ब्लॅकमेलच म्हणावे लागेल. मात्र चीनमध्ये त्यांच्यावर जसे प्राण गमावण्याचेही प्रसंग गुदरले तशी स्थिती भारतात आली नाही. इंग्रजांची राजवट भारतात आल्यावरही उघडपणे त्यांनी मिशनऱ्यांना धर्मप्रसाराचे कार्य करण्याला पाठिंबा दिला नाही, मदतही केली नाही; पण त्यांचे आतून सत्तेचे असलेले अनुसंधान लक्षात यावे इतके स्पष्ट होते. किंबहुना भारतात अगोदर मिशनरी आले आणि नंतर येथील व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्लिश यांनी सत्ता पादाक्रांत करण्याच्या मार्गात त्या लोकांची मनोभूमिका तयार करून ठेवली. हे केले जाणारे धर्मातर भारताला एका दृष्टीने सामाजिक विषमतेची जाणीव होण्याच्या दृष्टीने जागरूक करणारे ठरले. हिंदूंमधील कालबाह्य व अन्यायकारी चालीरीती, रूढी, जातिजातींतील विषमता, श्रेष्ठकनिष्ठता यांमुळे हिंदू समाजातील एकसंधता विस्कळीत झालेली होती. अज्ञान व दारिद्र्य यांनीही हा भारतीय समाज ग्रासलेला होता. याचा फायदा मिशनरी घेतात हे लक्षात आल्यावर ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, थिऑसॉफिकल सोसायटी यांच्यासारख्या संस्था स्थापन करून भारतीय समाजामध्ये सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न झाले. लोकहितवादी, राजा राममोहन रॉय, दयानंद सरस्वती, अॅनी बेझंट, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, महात्मा फुले, महर्षी कर्वे, स्वामी विवेकानंद, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी अनेक विचारवंतांनी भारतीय समाजाला पुरोगामी नेतृत्व देणारा मार्ग दाखविला. हिंदू धर्मातील उणिवांचा फायदा मिशनरींना धर्मांतरासाठी घेता येऊ नये या हेतूने भारतभर वाहू लागलेले सुधारणेचे वारे हे मिशनरींनी चालविलेल्या धर्मातर मोहिमेसं अटकाव करण्याच्या भूमिकेतून वाहू लागले होते. राजसत्तेच्या स्थैर्यासाठी धर्मांतर केले जाते ही धर्मातराची ऐहिक पातळी परत एकदा या धर्मांतरामुळे व त्यांना होणाऱ्या विरोधाने स्पष्ट झाली.
धर्मांतराची कारणे विविध असतात. जीवनातील ऐहिक गरजा भागविण्यासाठी किंवा आत्मसन्मान प्राप्त करून घेण्यासाठीही धर्मांतर होत असते; पण अनेकदा यामध्ये होणारी फसगत लक्षात येता निराशाही पदरी येते. परत पहिल्या धर्मातील प्रवेशाचे द्वार तर बंद झालेले असते, पण परत हिंदू होण्यामध्ये कमीपणा व मानहानी वाटत असते. ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करताना हिंदूंमधील अनेक जातींना जातिभेदाच्या बंधनातून सुटल्याचा आनंद प्रथमदर्शनी वाटला असला तरी नंतरच्या रोटी-बेटी व्यवहारांमध्ये त्यांची हिंदू धर्मातील जात लक्षात घेऊनच व्यवहार केला जात आहे, असे जाणवल्याने धर्मांतराने आपण काय साधले, असा निराशावादी सूरही अनुभवाला आलेला जाणवतो. शिवाय नवीन धर्माचा समूहाने स्वीकार करणाऱ्या या लोकांना नव्या धर्माची सर्व तत्त्वे आकलन होतात का, आणि ती कितपत अंगवळणी पडतात, हा प्रश्नही विचारात घेण्यासारखा आहे. वर्षानुवर्षांच्या त्यांच्या रक्तात भिनलेल्या श्रद्धा, जाणिवा, संस्कार धर्मांतर करताक्षणीच पुसल्या जातात काय? याचे उत्तर नकारार्थी असल्याने त्यांचे वर्तन धर्मांतराने स्वीकारलेल्या धर्मामध्ये आचार-विचारदृष्टीने थोडेफार वेगळेपण आणते, असे दिसून येते.
अनेक ठिकाणांच्या आदिवासी टोळ्यांमध्ये जाऊन त्यांना सुसंस्कार देण्याचे, शिक्षण देण्याचे व त्या मार्गाने त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्यही मिशनरींनी केलेले दिसून येते. अशा ठिकाणी ख्रिश्चन समाजाची वाढती संख्या त्या मिशनरींच्या कार्याची निष्ठा लक्षात आणून देते. १९९९ च्या दक्षिण गुजरातच्या संदर्भातील रिपोर्ट या प्रकारचा आहे. धर्मांतराचा अशा सर्व दृष्टींनी विचार केल्यास धर्मांतराला मान्यता द्यावी की त्यावर बंदी घालावी, असा एकाच बाजूने निर्णय देणे कठीण वाटते. स्वतःला एखाद्या धर्माची तत्त्वे पटली व आपल्या जन्मदत्त धर्मामध्ये असलेल्या त्रुटी जाणवून त्याचा त्याग करावासा वाटला म्हणून केलेले धर्मांतर निषिद्ध ठरणार नाही. विवेकानंदांचे कार्य पाहून हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या भगिनी निवेदिता किंवा ज्ञानकोशकार डॉ. केतकरांच्या कार्यामध्ये रस वाटून हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या त्यांच्या विदुषी जर्मन पत्नी शीलवतीबाई यांसारखी उदाहरणे धर्मांतराचे निष्ठा व व्यावहारिक स्वरूप स्पष्ट करणारी आहेत. पण अशी उदाहरणे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी कमी असतात. आज ज्या धर्मांतराचा प्रामुख्याने विचार करावा लागतो, तो समूहाने करून घेतल्या जाणाऱ्या धर्मांतराचा होय. हे धर्मांतर राजकीय पक्षांतराइतके स्वार्थाकडे झुकलेले, सत्तेवर लक्ष ठेवून करून घेतले गेलेले आणि सोपे असते. त्यामध्ये तत्त्वनिष्ठा व जीवनविषयक सखोल चिंतनाचा भाग असण्याची सुतराम शक्यता नसते. असे धर्मांतर बुद्धिभेद करून, कधी सक्तीने तर कधी अनेक आमिषांची प्रलोभने दाखवून, समूह पातळीवर साधलेले असते. आज भारतातील मुस्लिम किंवा ख्रिश्चन यांसारख्या काही धर्मांची वाढती लोकसंख्या धर्मातराशी निगडित आहे. जातीच्या आधारे जशा शिक्षणात सवलती प्राप्त करून घेता येतात; तशाच, सवलती उपजीविकेच्या अनेक क्षेत्रांत मिळविता येतात. त्यासाठी धर्मांतरे होऊ लागली तर कोणत्याही धर्मामध्ये अपेक्षित असलेली गुणवत्तेची जोपासना, नैतिक पातळी व संस्कृतिसंवर्धन टिकवून ठेवणे कठीण जाते.
आधुनिक कालखंडात धर्म ही वैयक्तिक बाब समजली जाते. भारतासारख्या विविध धर्मपंथांच्या प्रदेशात सर्वधर्मसहभाव बाळगण्याची शिकवण दिली जाते आणि तरीही हिंदू धर्मातील विषम व्यवस्थेकडे बोट दाखवून काही मिशनरी भारतीयांना धर्मांतराला प्रवृत्त करतात. सामूहिक धर्मातरांनी राजकारणातील नेत्यांचे संख्याबळ वाढते; म्हणून धर्मांतराला विरोध करण्याचे कुणी मनात आणत नाही. शिवाय धर्मांतरामध्ये बळजबरी नसावी असे कागदोपत्री सर्वच धर्म मान्य करतात; पण वास्तव मात्र वेगळेच असते.
भारताच्या आजपर्यंतच्या धर्मातराच्या विविध चळवळींवरून काही गोष्टी लक्षात येतात. भारतीयांनी कधी इतरांना धर्मांतराची सक्ती, हिंदु धर्माच्या संदर्भात केलेली दिसत नाही. याचे कारण काय? भारतीयांची व्यापक व सहिष्णू दृष्टी, की हिंदने एकदा धर्मांतर केले की त्याला परत आपल्या धर्मात प्रवेश करण्याची सोय हिंदुधर्माने न ठेवणे? भारतात राज्य करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी अनेक हिंदू व रजपूत सरदारांना राजसत्तेतील अनेक आमिषे दाखवून धर्मातरास प्रवृत्त केले; पण ख्रिश्चन मिशनरींनी गरिबी, जातिविषयक अन्याय यांचे निर्मूलन करण्याचे आमिष दाखवून भारतीय जनतेला ख्रिश्चन धर्मामध्ये समाविष्ट केले. पण हिंदूंनी असे काही केले नाहीच. पण ज्या मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मांतरितांना परत हिंदू धर्मामध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांना तसे दार हिंदू धर्माने उघडे ठेवलेले नाही. शिवाजीमहाराजांनी नेताजी पालकरांना परत हिंदू धर्मात घेतले आणि डॉ. ज्ञानकोशकार केतकरांनी व्रात्यस्तोम विधीसारखा जुना विधी शोधून काढून जर्मन स्त्रीला हिंदू धर्मात घेऊन मग तिच्याशी विवाह केला; पण यांपैकी जर्मन वा अन्य धर्मीय स्त्रीला धर्मबदलाची गरज भासत नाही. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुष्कळदा पतीचा धर्म हाच तिचा धर्म ठरतो आणि त्या दोघांच्या संततीचा वडिलांच्या धर्मामध्येच समावेश होत असतो. उदाहरण द्यायचे तर, मीनाकुमारी व नर्गिस यांच्या मातृकुलातील स्त्रिया हिंदू होत्या; पण त्यांची संतती हिंदू राहू शकत नाही. पूर्वीच्या काळी अनेक हिंदंनी राजकीय क्षेत्रातील पदासाठी आपल्या मुली-बहिणी मुस्लिम सुलतानांना वा बादशहांना दिल्या. अर्थातच त्यांची पुढची पिढी मुस्लिम ठरली. अकबराची राणी जोधाबाईंचा पुत्र जहांगीर हे तर राजघराण्यातीलच उदाहरण आहे.
अशा कोणत्या ना कोणत्या मोठ्या आमिषांच्या हेतूने झालेल्या धर्मातरांची उदाहरणे असंख्य आहेत. इमादशाही स्थापन करणारा फत्तेउल्ला इमादशहा हा मूळचा तेलंगी ब्राह्मण. त्याने इस्लाम धर्म स्वीकारून क्हाडची सुभेदारी मिळविली. निजाम उल्मुल्क-बहिरी हा दक्षिणेकडील वजीर मूळचा हिंदू होता. इ. स. १३९६ मध्ये काशीर-ला-सिकंदर नावाच्या तुर्कवंशीय राजाचा मुसलमान प्रधान हा मूळचा हिंदू ब्राह्मण होता. त्याच्या मदतीने सिकंदराने अनेक देवळे पाडून स्वत:ला 'मूर्तिनाशक' हे पद जोडले. उदेपूरच्या राणा प्रतापसिंगचा भाऊ संगराजित मोगलांकडे आला. त्याचा मुलगा पुढे जहांगीरचा सर्वांत मोठा सरदार झाला. केरळचा राजा, मलबारचा पेरूमाळ राजा तर कालिकतचा सामुरी राजा यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. अर्थातच, त्यांच्या प्रजेनेही मुस्लिम धर्म स्वीकारला. अशा अनेक उदाहरणांवरून धर्मांतराच्या पाठीशी असलेले हेतू स्पष्ट होतात. अशा सत्तेच्या आमिषासाठी होणारी धर्मांतरे ही राजकीय पक्ष बदलण्याइतकी सोपी असतात. मानसिक उत्कर्षाशी किंवा धर्मनिष्ठेशी त्यांचा सुतराम संबंध नसतो.
एका वेगळ्या अर्थानेही सत्तेच्या स्थिरतेसाठी धर्मांतराचा उपयोग होत असतो हे लक्षात घ्यावे लागते. भारतातील मुस्लिमांचे, ख्रिश्चन वा बौद्ध, जैन इत्यादी छोट्या-मोठ्या धर्माचे संख्याबल वाढते ठेवणे हे धर्मातराचे उद्दिष्ट, एक प्रकारे सत्तास्थिरतेसाठीच असते. प्रथम अल्पसंख्याक म्हणून सवलती घ्यायच्या आणि आपापल्या धर्माच्या विस्ताराची मुळे पक्की करायची; पुढे संख्येच्या जोरावर सत्तेमध्ये हक्क मागायचे, हे राजकारण भारतातील धर्मातरामध्ये दिसून येते. मात्र ते केवळ भारतातच आहे असे नाही तर जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही देशामध्ये हेच चित्र दिसेल. धर्म व धर्मातर यांच्याकडे ज्या उच्च व आध्यात्मिक पातळीवर पाहिले जाते त्यापेक्षा प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा संबंध फक्त व्यावहारिक जीवनपातळीवरील फायद्या-तोट्याशीच असतो, हेच यावरून स्पष्ट होत आले आहे.
धर्मातराच्या संदर्भात भारतीयांची भूमिका काय होती हे लक्षात घ्यायला पाहिजे. भारतात स्थिरता प्राप्त झालेल्या वैदिक किंवा हिंद किंवा भारतीय धर्माच्या लोकांनी धर्मांतर करून भारतीयांची किंवा वैदिक धर्मीयांची संख्या वाढती ठेवण्याचा प्रयत्न का केला नाही? इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माचा प्रसार जगभर झालेला दिसतो. त्यामागे त्यांच्या मिशनरी प्रवृत्तीचे सामर्थ्य उभे आहे. भारतीयांची संख्या मात्र भारताबाहेरच्या विविध देशांमध्ये किती आहे? त्यातही धर्मांतर करून वैदिक/हिंदू झालेल्यांची उदाहरणे अपवाद म्हणूनही सापडतील की नाही, याची शंकाच आहे. त्या मानाने भारतातील बौद्ध वा जैनधर्मीयांची संख्या भारताबाहेरच्या क्षेत्रात संख्येने लक्षात घेण्यासारखी आहे; पण त्यातही धर्मांतरित झालेले बौद्ध व जैन किती? ख्रिश्चन, इस्लाम वा अन्यधर्मीयांना आपल्या धर्माकडे आकृष्ट करून घेण्याचे प्रयत्न वैदिक/हिंदु धर्माने का केले नाहीत? याला कारणे कोणतीही असली तरी त्यामुळे हिंदू किंवा भारतीयांची संख्या, जगाच्या पाठीवर ख्रिश्चन व मुस्लिमांच्या तुलनेत खूपच कमी आहे, हे विसरून चालणार नाही. भारतामध्ये विविध पंथ, संप्रदाय, धर्म असल्याने एखाद्याला भारतीय धर्मात प्रवेश देताना, त्याने त्यातील कोणत्या धर्माचा स्वीकार करावा हा प्रश्नही सोडविण्याची गरज धर्मातरामागे येत असेल. सर्व भारतवासीयांना एका धार्मिक सूत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न जितक्या सावधानतेने व जागरूकतेने व्हायला पाहिजे तेवढा न झाल्याने धर्मांतराच्या आघाडीवर भारताला स्वधर्मीयांची संख्या वाढविण्याचा मार्ग उरलेला नसावा. लोकशाहीमध्ये अनेक प्रश्नांना लोकसंख्येचे पाठबळ असावे लागते. त्याची पायाभरणी धर्माच्या बैठकीवर केलेली असते. भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांची गुंतागुंत या धर्मातराशी निगडित आहे. भारतीय नागरिक अनेक धर्म अनुसरणारा असल्याने त्याच्या निष्ठा, त्याची संस्कृती लक्षात घेऊन भारताचे प्रश्न उलगडावे लागतात.
सारांश
धर्मातरामागची कारणे कोणती? धर्मांतराला प्रवृत्त करण्यामागे धर्मांतरकर्त्यांचा स्वधर्माभिमान, इतर धर्मांबद्दलची दुय्यमत्वाची भावना व स्वधर्मीयांची संख्या जास्तीत जास्त वाढती ठेवणे हे हेतू असतात. माणसाला जन्मत:च धर्म स्वीकारावा लागतो; तो धर्म- (१) नवी तत्त्वे पटल्याने (२) सक्तीने (३) एखाद्या राजकीय वा व्यावहारिक फायद्यासाठी (४) स्वधर्मातील अन्याय्य वागणुकीने त्रस्त होऊन किंवा (५) स्वधर्मातील आचार-विचारात कालानुरूप बदल आवश्यक वाटल्याने- त्याला बदलावासा वाटतो. अनादिकालापासून वैदिकातून बौद्ध, जैन इत्यादी किंवा नाथ, महानुभाव वारकरी, सूफी इत्यादी संप्रदाय ही धर्मांतरेच होत. या सगळ्यांमध्ये आदानप्रदान प्रक्रिया होत असल्याने भारतात अनेक धर्म, संप्रदाय किंवा पंथ असूनही 'विविधतेतून एकत्व' समन्वयाच्या तत्त्वावर जोपासले गेले; पण मुस्लिम व ख्रिश्चन धर्माचे स्वरूप त्यामध्ये एकवटून जाऊ शकले नाही.
धर्मांतरामागे राज्यविस्तार हा हेतू प्राचीन काळापासून आहे. मिशनरी हे परदेशीयांना प्रथम धर्मांतराला प्रवृत्त करतात आणि नंतर राज्यसत्ता तो देश काबीज करते. भारतातील अज्ञान, दारिद्रय, सामाजिक जाती व स्त्रीजातीवरील अन्याय यांवर प्रकाशझोत टाकून मिशनरींनी ख्रिश्चन धर्मप्रसार केला. धर्मांतर करूनही त्या त्या समाजाचे प्रश्न तसेच राहिले. पण हिंदु धर्मात परत प्रवेश करण्याचा मार्ग, हिंदू धर्माने न ठेवल्याने धर्मांतर बदलण्याचा पर्याय त्यांच्याजवळ राहिला नाही. परिणामी, भारतामध्ये ख्रिश्चनांची संख्या वाढती राहिली. त्यांच्या निष्ठा भारताशी बांधलेल्या राहिल्या नाहीत. तीच परिस्थिती मुस्लिमांच्या संदर्भातही आहे. नागरिकत्व भारताचे व निष्ठा मात्र भारताबाहेरच्या राष्ट्राशी, त्यामुळे भारताच्या विविधतेतील एकतेला तडा जाऊ लागला. याचा दोष त्या त्या धर्मातरांना देण्यापेक्षा- (१) हिंदू धर्माने धर्मांतरे करण्याचा मार्ग का अनुसरला नाही? (२) ज्या हिंदूंनी धर्मातरे केली आहेत, त्यांना परत हिंदू व्हायचे असले तर तशी सोय का ठेवली नाही? किंवा (३) अनेक धर्माचे लोक भारतात भारताचे नागरिक म्हणून नांदत असतील तर त्यांच्यामध्ये 'भारतीय म्हणून एकत्व' जपण्याचा प्रयत्न किती केला जातो? यांसारख्या प्रश्नांवर विचारवंतांनी लक्ष केंद्रित करायला पाहिजे.
COMMENTS