Essay on Child Life in Marathi Language : In this article " बाल जीवनाचे स्वरूप व सुधारणा मराठी निबंध ", " Child Life Marathi ...
Essay on Child Life in Marathi Language: In this article "बाल जीवनाचे स्वरूप व सुधारणा मराठी निबंध", "Child Life Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Child Life", "बाल जीवनाचे स्वरूप व सुधारणा मराठी निबंध" for Students
आयुष्यातील भलेबुरे अनुभव घेतल्यावर मोठ्यांना 'रम्य ते बालपण' असे वाटते. पण त्यांनाच बालपणी मात्र ‘आई, मी मोठा कधी होणार?' अशी मोठे होण्याची ओढ लागलेली असते. आजच्या बालकांना व लहान मुलांनाही अशीच मोठे होण्याची ओढ लागलेली असते; आपल्या पाल्यांना वयाबरोबरच कर्तृत्वानेही 'मोठे' करणे, ही त्यांच्या पालकांची, शिक्षकांची व पर्यायाने समाजाची जबाबदारी असते. ही जबाबदारी निभाविण्यासाठी पालकांजवळ कोणती वैशिष्ट्ये असायला पाहिजेत, शिक्षकवर्ग व बालवाड्या यांच्यातील शिक्षण कसे असावे व मुलांच्या सभोवतालचे सामाजिक वातावरणही त्यांच्यातील गुणांना वाव देणारे कसे करता येईल, याचा विचार व्हायला हवा.
पूर्वीच्या एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये मुलांचे बालपण घराच्या सावलीतच सुरक्षितपणे व्यतीत होई. त्यांना घराबाहेरच्या सार्वजनिक जीवनाचा अनुभव उशिरा येत असे; पण आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील बालकांना वयाच्या अडीच-तीन वर्षांपासूनच अंगणवाडी व बालवाडीच्या निमित्ताने उंबरठ्याबाहेरच्या जीवनाच्या अनुभवाला सामोरे जावे लागते. या समूहजीवनाच्या अनुभवाने त्यांच्या जडणघडणीत येणारा वेगळेपणा कोणता? कालच्या बालकापेक्षा आजच्या बालकामध्ये येणाऱ्या वैशिष्ट्यांमध्ये त्यामुळे वेगळेपणा येतो की काय. व तो घातक असेल तर यासाठी उपाय कोणते? याचा विचार व्हायला पाहिजे.
विभक्त कुटुंबातील घरचे वातावरणही वेगळे असते. नोकरीच्या व्यापात गुंतलेल्या आई-वडिलांचा मुलांना मिळणारा सहवास फार अपुरा असतो. आपण मुलांना पुरेसा सहवास देऊ शकत नाही याची जाणीव असलेले पालक अपराधी भावनेने ती उणीव भरून काढण्यासाठी अनाठायी खर्च करून मुलांचे वारेमाप लाड करतात किंवा त्यांना शिस्तीच्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक बालक भिन्न प्रकृतीचे असल्याने त्याचा प्रकृतिधर्म लक्षात घेतल्याशिवाय असे वर्तन घातक ठरू शकते. मुलांचे कोणते लाड पुरवायचे व त्यांना कोणत्या प्रमाणात शिस्त लावायची याचे ढोबळ आराखडे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या स्वभावाच्या प्रवृत्तीनुसार ठरवायला पाहिजेत.
बालकावर होणारे संस्कार हे जन्माला येण्याच्या अगोदरपासून म्हणजे मातेच्या उदरात असल्यापासून घडत असतात. यासाठी पूर्वीच्या कुटुंबामध्ये आईचे मन प्रसन्न राहण्यासाठी डोहाळजेवण वा अन्य समारंभांचे आयोजन केले जायचे. सामान्यतः गरोदर स्त्रीचे जीवन गरोदरपणी घराच्या आसपासच्या वातावरणात जात असल्याने तिच्या मनाचे स्वास्थ्य टिकायला योग्य असे व पोषणयुक्त आहार घ्यायला वाव मिळत असे; पण नोकरीच्या निमित्ताने घराबाहेरच्या जगात नोकरदार म्हणून वावरताना ही मानसिक व शारीरिक पातळीवरची पथ्ये पाळणे तिला जमत नाही. परिणामी, या धावपळीचा व व्यस्त मनःस्थितीचा परिणाम गर्भावर होत असतो. मात्र आजच्या यंत्रचलित विश्वामध्ये अनेक सुविधांनी बालकाची ही गर्भातील वाढ नोंदण्याची व त्यासंबंधी योग्य ती दक्षता घेण्याची सुविधाही अनेक स्त्रिया घेऊ शकतात; त्यामुळे मानसिक व शारीरिक अव्यंगता राखता येऊ शकते.
बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी गर्भावर कसे संस्कार व्हावेत याचाही विचार विज्ञानाने केला आहे. मनःशक्तीसारख्या केंद्रांमधील जन्मपूर्व संस्कारांसारखे संस्कार या दृष्टीने उपयुक्त आहेत. मात्र त्याची माहिती व त्यावर विश्वास असण्यासाठी आवश्यक ती सुशिक्षितपणाची जाणीव फारच थोड्या पालकांजवळ असते. यासाठी आई-वडील, दोघांनी वेळ काढायला पाहिजे. पण आजच्या नोकरी करणाऱ्या स्त्रीला गरोदरपणासाठी रजा घेतानाही पुरुषवर्गाची नाराजी पत्करावी लागते. तेव्हा बालकावरच्या जन्मपूर्व संस्कारांसाठी वेळ व आर्थिक खर्च करण्याची आवश्यकता कशी पटावी? शारीरिक दृष्टीने आजची माता कालच्या मातेइतकी सुदृढ असतेच असे नाही. कामगार वर्गातील स्त्रीप्रमाणे ती काटकपणातही उणीच असते. या सगळ्यांचा परिणाम बालकाच्या नुसत्या शारीरिक वाढीवर होत नसतो, तर तो त्याच्या सर्व प्रवृत्तींवरही घडत असतो.
वयाच्या पहिल्या अडीच-तीन वर्षांपर्यंतच्या काळातील मुलावर होणारे संस्कार त्याला आयुष्यभर साथ देत असतात, असे मानसशास्त्र मानते. त्याच्या आवडीनिवडी, राग-लोभादी प्रवृत्ती, बौद्धिक व कलाविषयक क्षमताकेंद्रे ही निश्चित झालेली असतात. एक प्रकारे त्याच्या भावी आयुष्याची ती बैठकच असते. हा काळ अत्यंत संवेदनक्षम काळ असतो, याची जाणीव ठेवून घरातील बालकाच्या सभोवतालचे वातावरण निकोप ठेवण्याची काळजी घेणे फारच थोड्या पालकांना जमते. योग्य आहार-विहार, विश्रांती, प्रसन्नता या गोष्टी त्याच्या विकासाला पोषक ठरतात. मुख्यतः पालकांचे विशेषतः आईचे सान्निध्य, तिचा स्पर्श, तिचा आवाज हे त्याच्या आधाराचे महत्त्वाचे स्थान असते. तिच्या मनातील मातृत्वभाव त्याला घडवीत असतो. मूल मोठे होऊ लागल्यावर स्वत:चे वेगळे जग निर्माण करीत असते; पण या जगात प्राथमिक अवस्थेत 'आई' हेच त्याचे विश्वासाचे केंद्र असते. परंतु हा मातेचा सहवास पुरेशा प्रेमळपणाने, निवांतपणे बाळास मिळू शकत नाही. आजच्या जगात त्याच्या आईला निभवाव्या लागणाऱ्या अनेक भूमिका आणि सांभाळावी लागणारी विविध व्यवधाने त्यामध्ये व्यत्यय आणतात.
त्याच्या जीवनातील दुसरी अवस्था म्हणजे बालवाडीचे जग. शिक्षणाचा प्रारंभ बालवाडीपासून होत असतो. बालवाडीत येणाऱ्या बालकांच्या शारीरिक-मानसिक विकासाला पोषक असे वातावरण बालवाडीमध्ये हवे. बालशिक्षण हे पहिल्या पाच-सहा वर्षांपर्यंत त्याच्या मनावर होणारे संस्कार व त्याला मिळणारे (अनुभवजन्य) शिक्षण त्याच्या आयुष्याचे निर्णायक शिक्षण असते. नंतरच्या आयुष्यातील शिक्षणाने त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये फारसा फरक पडत नसतो, हे फ्राइडसारख्या मानसशास्त्रज्ञाचे मत बालशिक्षणाच्या संदर्भात लक्षात ठेवायला पाहिजे.
बालवाडीत येणाऱ्या मुलाच्या मनाची पाटी कोरी नसते; कारण मूल गर्भावस्थेत असल्यापासूनच शिकत असते. सुभद्रेच्या गर्भात असलेल्या अभिमन्यूला चक्रव्यूहाचे ज्ञान असेच झाले होते. मुलांच्या या शिक्षणामध्ये आनुवांशिकतेला व त्याच्या सभोवतालच्या वातावरणाला अत्यंत महत्त्व असते, हेही विसरून चालत नाही. मुलाजवळच्या उपजत प्रवृत्ती व क्षमताकेंद्रे कशी विकसित होतील याचा शिक्षणामध्ये विचार व्हायला पाहिजे. मेंदूच्या संदर्भात झालेल्या नव्या संशोधनानुसार प्रत्येक मुलाची विकसित होऊ शकणारी क्षमताकेंद्रे वेगवेगळी असतात. एका क्षमताकेंद्रामध्ये प्रगत असलेले मूल दुसऱ्या क्षमताकेंद्रामध्ये प्रगत असेलच असे नाही; म्हणून शिक्षणक्रमामध्ये या सर्व प्रकारच्या बालकांचा विकास गृहीत धरून अभ्यासक्रम राबविलेला असला पाहिजे.
बालक अनुभवांतून शिकत असते; ज्ञान-संपादन करीत असते. संगीतासारख्या, वादनासारख्या कलेतील त्याच्या कृतिशीलतेचा त्याला त्याची क्षमता वाढविण्यामध्ये उपयोग होत असतो. बडबडगीते, नादलयीतील वाद्यसंगीत यांचा उपयोग बालशिक्षणात प्रभावी ठरतो. संगीत व भावनिकता यांचे अतूट नाते असते; म्हणूनच भावनिक व स्नेहपूर्ण वातावरण मुलाच्या विकासाला पोषक असते. त्याच्या आवडीनिवडी व त्याचा कल बालपणीच व्यक्त होत असतो. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या म्हणीचा हाच अर्थ आहे. त्याची ही सबलता व दुर्बलता कोणकोणत्या संदर्भात आहे हे लक्षात घेऊन त्याला घडविण्यासाठी त्याच्यातील सबलतेचे पोषण केले पाहिजे व त्याच्यातील दुर्बलतेवर मात केली पाहिजे.
त्याचे दोन ते पाचपर्यंतचे वय हे मेंदूबांधणीचे व सभोवतालच्या भौतिक, प्राणी, मनुष्यजग यांबद्दलचे स्वत:चे सिद्धान्त बनविण्याचे असते. या बालवयात भाषा हे माध्यम संवादाच्या आकलनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. भाषाशिक्षणाने त्याचा स्वतःशी व जगाशी संवाद सुरू होतो; म्हणून भाषाशिक्षण महत्त्वाचे ठरते. प्रत्यक्ष अनुभवाच्या जोडीला ज्ञानसंपादनाचे भाषा हे वेगळे साधन त्याच्या हाती या वयापासून येत असते. या वयात त्याला बोलायला, वाचायला शिकविणे उपयुक्त ठरते. त्याच्या जन्मजात कुतूहल-प्रवृत्तीला पोषक व जिज्ञासावृत्तीला खाद्य पुरविण्याचे कार्य अभ्यासक्रमाने करायला पाहिजे. आसपासच्या प्रत्येक गोष्टीकडे ते बालक कुतूहलाने पाहत असते. ही त्याची कुतूहलवृत्ती जागृत ठेवणे, त्याच्या जिज्ञासेची तृप्ती करणे, त्याला पटेल अशा त-हेने समजावणे हे बालवाडीतील शिक्षकाचे कार्य असते. प्रत्येक मुलाच्या घरचे वातावरण वेगवेगळे असू शकते. त्याच्या सवयी भिन्न असतात. त्या समजून घेऊन शाळेच्या सार्वजनिक वातावरणात रुळण्याची सवय त्याला लागली पाहिजे. त्याच्या चांगल्या वागण्याचे कौतुक करणे, त्याला प्रोत्साहन देणे व त्याच्या चुकांकडे कठोरपणे न पाहता, त्याला चुचकारणे याची गरज असते. बालवाडीतील शिक्षकाचे वर्तन, बालवाडीतील वातावरण व बालकांसाठी असलेला अभ्यासक्रम या तिन्हींचा एकत्रित परिणाम बालकाच्या विकासाला कारणीभूत होत असतो. त्याला शिकणे हे आनंदाचे वाटले पाहिजे, सक्तीचे नको. म्हणूनच बडबडगीते म्हणण्याची, ऐकण्याची, नादातालात त्यावर हालचाली करण्याची सवय महत्त्वाची ठरते. अक्षरओळखीच्या आधी तोंडी संवाद असावेत. अक्षरओळख करून देण्याच्या अगोदर तोंडी संवादातून भाषेचा परिचय व्हावा लागतो. प्राण्यांची, पक्ष्यांची, ओळखीच्या वस्तूंची चित्रे दाखवून त्यांची नावे शिकविताना उच्चारशुद्धतेकडेही लक्ष पुरवावे. कागदावर रेघोट्या काढण्याची सवय लावावी. लेखन हा त्यानंतरचा विषय ठरतो. अशा मार्गाने, त्याच्या अभ्यासक्रमातून त्याच्या ठिकाणी असलेली जिज्ञासूवृत्ती जागृत करण्यावर भर असावा लागतो. ज्ञानाची गोडी अशा पायरीपायरीने लावावी लागते. त्याच्या कुतूहलाचे विषय कोणते व त्याची कुतूहलपूर्ती कशी करावी याचे तंत्र शिक्षकाला समजले पाहिजे. श्रीरामाने बालपणी आकाशातल्या चंद्राचा हट्ट धरला होता; पण त्याचा हट्ट आरशातला चंद्र पाहून पूर्ण झाला. यासाठी बालविश्वाची कल्पना असावी; पण इतक्या जाणिवेने बालवाड्यांचे अभ्यासक्रम तयार होतात काय? प्रत्येक ठिकाणी चांगल्या त-हेने शिकविणारे शिक्षक मिळतात काय? आणि बालकाच्या सभोवतालचे बालवाडीचे वातावरण स्नेहमय, प्रेमळ, बालकाला घरासारखे वागणूक देणारे असते काय? या प्रश्नांची उत्तरे आपण आपल्याजवळच ठेवावीत. समाजाची अंगणवाडीची व बालवाडीची गरज ओळखून गल्लीबोळातून छोट्याशा जागेत आर्थिक उपजीविकेचे साधन म्हणून चालविल्या जाणाऱ्या बालवाड्यांकडून अशा आदर्शाची अपेक्षा किती करता येईल? एक मात्र निश्चित की, सगळ्याच बालवाड्यांतून सरसकट पोटार्थी धोरण नसते. बालवाड्यांची संख्या अधिक असली तरी त्यांच्यातही स्पर्धात्मक वातावरण असल्याने, त्यांनाही बालकांची देखभाल काळजीपूर्वक करण्याची गरज असते आणि मुख्यत: येथील शिक्षकवर्ग महिलांचा असल्याने त्यांच्या वात्सल्याचा लाभ या बालकांच्या विकासासाठी मिळत असतोच. सामाजिक परिसर
बालजीवनाच्या जडणघडणीमध्ये त्याच्या सभोवतालचा निसर्ग व सामाजिक परिसर यांना फार मोठे स्थान असते. निसर्गाचा सहवास त्यांना खूप शिकवितो. तसेच सामाजिक जीवनातील विविध स्तरांवरचे जीवन त्यांच्या संवेदनांना पूरक ठरते. गरिबी, सधनता, माणसातील दुर्बलता, यांत्रिक सुविधा, विविध सण, माणसांमधील चालीरीती इत्यादींमुळे त्यांना सभोवतालच्या सामाजिकतेचे भान येत असते आणि त्यांच्यातील वैशिष्ट्यांना आकार येत असतो. घरात व समाजात त्यांचे वागणे नकळत वेगळे होऊ लागते. घरात हट्ट करणारी, दांडगाई करणारी मुले बाहेर तशीच वागतात असे नाही. सामाजिक परिसराच्या प्रतिक्रिया त्यांच्या मनात उमटत असतात.
समाजात शिक्षणाला, सृजनत्वाला किंमत असेल तर त्याचा प्रभाव मुलांवर पडतो. आजचे चित्रपटसृष्टीचे वेड कालच्या पिढीत नव्हते; म्हणूनच कलावंत किंवा क्रिकेटवीर होण्याचे स्वप्न मुले पूर्वी पाहत नव्हती; पण आजच्या मुलांसमोर पुस्तकी शिक्षणाइतकाच या क्षेत्राचा आदर्श आहे. परदेशी मालाची भलावण करण्याची प्रवृत्ती भारतीय समाजात प्रथमपासूनच आहे. तीच आजच्या मुलांनाही आकर्षित करीत आहे. सधनता व परदेशगमन यांचा पक्का सांधा सामाजिक वातावरणामुळे त्यांच्याही मनात रुजलेला आहे. भारतीय पोशाख, भारतीय चालीरीती, भाषा इत्यादींबद्दलची दुय्यमतेची भावना पुढच्या पिढीच्या या उगवत्या बालमनात रुजत आहे, ती या सामाजिक परिसरामुळेच.
घर, शाळा व समाज या तिपेडी परिसरात त्याचे बाल्य उमलत असते. या तीनही परिसरांचे आजचे स्वरूप कालच्यापेक्षा कितीतरी वेगळे आहे. पण त्याचा अर्थ असा नव्हे की, कालचे ते सगळेच चांगले व आचरणीय आणि आजचे मात्र वाईट व सुधारणा करण्यालायक ठरावे. एकत्र कुटुंबातील गृहकलह व ताणतणाव बालकाच्या वाढीला बाधकच होते. त्यामानाने आजच्या विभक्त कुटुंबातील व्यक्तिस्वातंत्र्यामुळे त्यांना निश्चित प्रकारची दिशा मिळू शकते. सभोवतालच्या शिक्षणाच्या अन्य सुविधांमुळे कालच्या बालकांपेक्षा आजच्या बालकांच्या आकलनक्षमतेत वाढ झालेली आहे. पालकांचीही बालकांकडे बघण्याची दृष्टी बदललेली आहे. मात्र हे चित्र मर्यादित प्रमाणातच आहे. समाजातील बहुसंख्य वर्गाला बालकांकडे पुरेसे लक्ष द्यायला पाहिजे याची समज नसल्याने दुर्गुण, वाईट सवयी, व्यसनाधीनता, गुंडगिरी इत्यादींचा ठसा बालकांच्या मनावर उमटत आहे. समाजाचा भावी आदर्श या मुलांमधून घडणार आहे हे लक्षात घेऊन सामाजिक परिसरातील वातावरण निकोप ठेवण्याचा प्रयत्न जागरूकतेने व्हायला पाहिजे.
सारांश
बालजीवनाचा विकास घर, शाळा व समाज अशा तीन परिसरांवर अवलंबून असतो. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे व सामाजिक परिस्थितीमुळे बालकाला पालकांचा स्नेहमयी सहवास कमी मिळतो. शाळेत त्याच्या विकासाला पोषक वातावरण असायला पाहिजे. ते असतेच असे नाही. सामाजिक परिसरातील प्रभावी घटकांनी त्याची जडणघडण वेगळी होत आहे. मात्र कालच्या बालकापेक्षा आजच्या बालकाचे मन अधिक आकलनक्षम आहे. बालमानसशास्त्राच्या जाणकारीने व यांत्रिक सुविधांनी पालकांची मुलांकडे बघण्याची दृष्टीही समजदारीची झालेली आहे. मात्र, सामाजिक परिसरातील गुंडगिरीचे व व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण कमी करता आल्याशिवाय बालकांच्या निकोप वाढीची अपेक्षा व्यर्थ ठरते.
COMMENTS