Autobiography of School Bag Essay in Marathi : In this article दप्तराचे मनोगत निबंध मराठी for students. School bag ki atmakatha essay in...
Autobiography of School Bag Essay in Marathi: In this article दप्तराचे मनोगत निबंध मराठी for students. School bag ki atmakatha essay in Marathi for class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Autobiography of School Bag", "दप्तराचे मनोगत निबंध मराठी", "Daptarachi Atmakatha in Marathi" for Students
झालं! फेकलंस ना मला कोपऱ्यात? बरोबरच आहे, आज शाळेचा शेवटचा दिवस होता ना! आता दोन महिने तरी तू माझ्याकडे ढुंकूनही बघणार नाहीस! खरं ना!!
मग पुन्हा जूनमध्ये शाळा सुरू होईल तेव्हा होईल माझी शोधाशोध. तोपर्यंत या अडगळीतच माझं वास्तव्य रे बाबा!
आणि दोन महिन्यांनी माझा 'अवतार' पाहून "मी नाही असलं घाणेरडं दप्तर घेऊन जाणार," असं म्हणत तू चक्क भोकाड पसरणार!
अरे, पण माझा वापर तू नीट केलास, थोडी काळजी घेतलीस तर दोन-तीन वर्ष सहज मी तुझी सेवा करेन; पण एवढं कुठलं आमचं भाग्य!
मागच्याच वर्षी तर तू मला घेऊन आलास. आठवतंय ना? वह्या, पुस्तके, पेन, नवीनच आलेला टिफिन. अशी सगळी खरेदी करून तू आईबरोबर रिक्षात बसणार एवढ्यात तुझं लक्ष माझ्याकडे गेलं. मोठ्या काचेच्या आत अगदी तयार होऊन बसलेलं मला पाहिलंस आणि आईचा हात ओढत ओढत दुकानाच्या दरवाजापाशी आलास. माझं आकर्षक रूप तुझ्या आईलाही आवडलं; पण किंमत पाहून तिनं नाक मुरडलं.
आठवतंय मला! बजेटच्या बाहेर जाणारी ही खरेदी तिला नको होती; पण तू कसला ऐकतोस. तू तर हट्टालाच पेटलास आणि नाइलाजानं आईनं माझा स्वीकार केला. मी मात्र तुझ्यासारखा खोडकर, अभ्यास मित्र मला मिळाला म्हणून खुशीत!
मला वाटलं, तू माझा छान सांभाळ करशील. तुझ्या बरोबर जाता-येता मित्रांबरोबर मारलेल्या गप्पा, विनोद, शाळेतील गमती-जमती, मित्रांची गुपितंसुद्धा ऐकायला मिळतील आणि झालं ही अगदी तसंच.
घरी पोहोचल्याबरोबर तू आजी-आजोबांना मला कडेवर घेऊन दाखवत घरभर नाचलास. आजोबांनी तर माझी चेन उघडून माझ्या तोंडातच हात घातला की! शाळेत तर तुझा भाव कित्ती वाढला. नाही का रे!
मग रोजच वह्या-पुस्तके-कंपास-डबा-पाण्याची बाटली असं सगळं काही आठवणीनं माझ्या पोटात ठेवून तुझ्याबरोबर प्रवास सुरू झाला. गमती-जमतीफजिती ऐकतच. शाळेतल्या शिक्षकांनी मित्राला कसा मार दिला. राजूला अजून घडाच वाचता येत नाही या आणि अशा गमती ऐकत आपण शाळेत कधी पोहोचायचो हेच समजायचे नाही.
अगदी सुरुवाती-सुरुवातीला तू माझी छान काळजी घ्यायचास; पण नंतर हळूहळू माझ्या अंगावर शाईचा डाग पडला, कधी सॉस सांडला तर कधी वेफर्सचा तेलकटपणा या गोष्टी मला विद्रूप बनवू लागल्या.
माझं हे रूप तुझ्या आईला मात्र पाहवत नाही. माझ्याकडे पाहत ती तुला रागावली तर तू माझ्यावरच चिडलास आणि मला दिलंस धुण्याच्या बादलीत फेकून.
दुसऱ्या दिवशी तुझ्या आईने छान पाण्यानं, भरपूर साबण लावून मला आंघोळ घातली. असं मस्त वाटलं; पण नंतर दिवसभर खुटीला उलट टागून ठेवलं, तेही भर उन्हात. चटके सोसावे लागले मला तुझ्यासाठी, माहीत आहे? आणि काय रे, परवा तुझा तो मित्र तुला एवढ्या हाका मारत होता तेव्हा लक्ष का दिलं नाहीस त्याच्याकडे? किती जोरात त्यानं मला हिसका दिला. माझा एक हातच तोडला की! तरी बरं तुझ्या आईने समोरच्या चांभाराकडून लगेच टाके घालून घेतले ते!
वर्षभर तुम्हा मुलांच्या पाठीवरचा माझा प्रवास (शाळा ते घर आणि घर ते शाळा) कसा आरामदायी असतो. वह्या-पुस्तकांना थोडी दाटीवाटी होते, अगदीच खेटून बसावं लागतं त्यांना; पण त्यांची काही तक्रार नसते माझ्याकडे!
दप्तराचं ओझं कमी करण्यासंबंधी अधूनमधून आपले शिक्षणतज्ज्ञ विचार मांडत असतात. काय म्हणतोस! तुला कसं माहीत? अरे, परवा शाळेतून आल्या आल्या तू मला सोफ्यावर फेकून तसाच खेळायला नाही का गेलास. तेव्हा तुझे बाबा बातम्याच तर पाहत होते ना! पण मला वाटतं दप्तराचं ओझं कमी होईल तेव्हा होईल; पण शाळेतला यूनिफॉर्म जसा सगळ्यांचा सारखा असतो तसेच सारखे दप्तरही असेल तर...?
कुणा विद्यार्थ्यांना त्यामुळे एकमेकांचा हेवा वाटणार नाही. कोणीही एकमेकांचा दुस्वास करणार नाहीत. गरीब-श्रीमंत अशी भेदभावाची भिंत लहानपणी तरी मैत्रीच्या आड येणार नाही, होय ना? चला, बराच वेळ झाला तुमच्याशी गप्पा मारतोय. आता या अडगळीतल्या वस्तूंशीच मी मैत्री करीन म्हणजे दोन महिन्यांचा हा 'वनवास' कसा पटकन् संपेल, खरं ना!
COMMENTS