Jan seva hich ishwar seva Essay in Marathi : In this article " जनसेवा हीच ईश्वरसेवा मराठी निबंध ", " Jan seva hich ishwar sev...
Marathi Essay on "Jan seva hich ishwar seva", "जनसेवा हीच ईश्वरसेवा मराठी निबंध" for Students
चंदन जणू दुसऱ्याकरिता झिजण्यासाठीच जन्माला येत असावं. ते स्वतः झिजतं आणि इतरांना आनंद देतं.
समाजातही अशा कित्येक महान विभूती आहेत ज्यांनी दुसऱ्यांसाठी जगण्यातच समाधान मानलं.
क्रांतिकारकांनी आपला देह समाजाला सुख मिळावं म्हणून स्वातंत्र्यासाठी अर्पण केला.
समाजसेवक आमटे कुटुंबीय, कोल्हे कुटुंबीय, अभय बंग, मदर तेरेसा, सिंधूताई सपकाळ ही नावे तर सर्वश्रुतच आहेत; पण देशासाठी लढणारे, देशाचे संरक्षण करणारे, तिन्ही दलांतील लोकही ईश्वर सेवाच करतात ना! आपले कर्म प्रामाणिकपणे करणारी ही माणसे आपल्या कार्यातून जनसेवा, पर्यायाने ईश्वर सेवाच करतात!
देवळात तासन्तास देवपूजेत व्यस्त राहणारी, मूर्तिपूजेला महत्त्व देणारी, देवाच्या दर्शनासाठी संकष्टी/ अंगारकीला मैलभर रांगेत उभं राहण्यात समाधान मानून आपला अमूल्य वेळ वाया घालवणारी माणसे पाहिली की, वाटते या लोकांना ईश्वर समजलाच नाही.
'शोधिसी मानवा, राऊळी-मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी'
माणसात देव पहावा. गरजवंताला मदत करावी. तिरुपती बालाजी मंदिरात कोट्यवधी रुपयांचे सोने जमा होते, तर गरीब शेतकरी बियाणांसाठी पैसा नाही म्हणून आत्महत्या करून जीवन संपवतो. 'नाम' सारख्या संस्था आता पुढे होऊन समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित घटकांकडे मायेने पाहतो आहे. आपणही त्यांना जमेल तशी मदत करायला हवी.
परमेश्वराचा अंश प्रत्येक सजीवात बसतो. आज अनेक व्याधिग्रस्त लोक, ज्यांना कुणी नाही ते सरकारी दवाखान्यांत मरणाची वाट पाहत जीवन कंठत असतात. अशांना आपण मदत करू शकतो.
पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त लोकांना मदत करणे ही ईश्वर सेवा.
माळीण गावात डोंगर खचला, संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. उत्तरांचलमध्ये ढगफुटी झाली. अशा वेळेला संपूर्ण देशभरातून त्यांना मदत पाठवली ही झाली ईश्वरसेवा. थोर विचारवंत, थोर साहित्यिक, थोर संशोधकही आपले उभे आयुष्य जनसेवेसाठीच खर्च करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी कर्वे, लो. टिळक, सावित्रीबाई फुले इ. थोर विभूती त्यांच्या समाजकार्याच्या व्रतामुळेच या जगातून गेल्या असल्या तरी त्यांच्या पवित्र कार्याचे आपल्याला विस्मरण होत नाही. त्यांच्या कार्याने त्या अजरामर राहतात. म्हणूनच आजही सगळा गाव स्वतः स्वच्छ करणारे गाडगेबाबा ‘स्वच्छता अभियान' करताना डोळ्यासमोर येतात. चंदन होण्यातच जीवनाची सार्थकता आहे.
'मधुबन खुशबु देता है,
सागर पानी देता है,
जीना उसका 'जी' ना है,
जो औरों को जीवन देता है!
व्यसनमुक्तीसाठी अवघे आयुष्य समर्पित करणारे अवलिया व्यक्तिमत्त्व डॉ. अनिल अवचट यांची ही ईश्वर सेवाच ना!
डॉ. रघुनाथ माशेलकरांनी 'नाम' ही आता केवळ संस्था न राहता एक व्यापक चळवळ झाली आहे, असे गौरवोद्गार काढून सामाजिक सेवेचं मूल्य समाजापुढे मांडलं. एक आदर्श या 'नाम'ने समाजासमोर ठेवला.
Awesome
ReplyDelete