Essay on Swavalamban in Marathi : In this article " आपला हात जगनाथ मराठी निबंध ", " Aapla Haath Jagannath Marathi Nibandh ...
Essay on Swavalamban in Marathi: In this article "आपला हात जगनाथ मराठी निबंध", "Aapla Haath Jagannath Marathi Nibandh" for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.
Marathi Essay on "Swavalamban", "आपला हात जगनाथ मराठी निबंध", "Aapla Haath Jagannath Marathi Nibandh" for Students
कराग्रे वसते लक्ष्मिः करमध्ये सरस्वति।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम्।।
आपली भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे पहा. सकाळी उठल्याबरोबर आपले दोन्ही तळहात जोडून वर दिलेला श्लोक म्हणायचा असं आपली संस्कृती सांगते.
हाताच्या टोकावर म्हणजे बोटांवर लक्ष्मीचा निवास असतो, तर तळहातामध्ये सरस्वती (लिहिताना पेन बोटात पकडले तरी तळव्याचा आधार लागतो) आणि हाताच्या सुरुवातीला (मनगट) गोविंद (म्हणजे इंद्रिये जिंकणारा) म्हणजेच शक्ती एकत्र असतात म्हणून आपल्या हाताचं दर्शन करायचं. इथं आणखी एक गोष्ट सांगाविशी वाटते की, आपल्या हाताचा आकार भारताच्या नकाशाप्रमाणे कल्पिला तर बोटांचा निमुळता भाग म्हणजे भारताचे दक्षिणेचे टोक आणि अंगठ्याजवळचा तळहाताचा मांसल भाग म्हणजे काश्मीर-हिमाचल प्रदेश. भारतात राहणाऱ्या दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, आपण कोणालाही 'नमस्कार' म्हणून वंदन करतो तेव्हा दोनही हात जोडून ते छातीपाशी नेतो, हृदयाजवळ नेतो. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा हा भेदभाव तिथं उरतच नाही.
हा सुविचार स्वावलंबनाचाही पाठ शिकवतो. दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपली कामे आपणच करावीत, अशी शिकवण देतो.
याच हातांनी शेतकरी पेरण्या करतो, चित्रकार चित्रं काढतो, शिल्पकार एखादया ओबडधोबड दगडातून शिल्प साकारतो, संशोधक शोध लावतो, लेखक लिखाण करतात. घरातील स्त्री चटके सोसत अन्न बनवते, मजूर घरे बांधतात, विटा वाहतात. म्हणून तर बहिणाबाई चौधरी मनुष्यप्राण्याला नशीबवान म्हणतात. कारण इतर पशुपक्ष्यांना देवाने हात किंवा बोटे कुठे दिली आहेत? ती केवळ मनुष्याकडेच आहेत. देवाने दिलेल्या या देणगीचा आपण सदुपयोग करायला हवा ना!
याच हातांनी परमेश्वराचे नामस्मरण करत, टाळी वाजवून भजन-कीर्तनातून मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर करता येईल.
याच हातांनी दान करून गरजूंची गरज भागवता येईल. याच हातांनी वृद्धांची किंवा आजारी व्यक्तींची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला लाभेल.
हेच हात प्रेमळ होऊन सिंधूताई सपकाळ, मदर तेरेसांचं रूप घेऊन अनाथांनादुबळ्यांना जेव्हा मदत करतात ना तेव्हा त्या हातांना आलेलं महत्त्व काय वर्णाल!
सचिन तेंडुलकरचे हेच हात क्रिकेटच्या खेळात जेव्हा षटकार ठोकतात, तेव्हाच दोन हातांनी टाळ्या वाजवून लोकांची वाहवा मिळवतात. हेच हात आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवतात.
आणि हो! दुष्कर्म करणारेही हेच हात असतात; पण ज्या हातांना सत्कर्म करायची संधी परमेश्वराने दिली आहे, त्यानं नामुश्कीचं जिणं देणाऱ्या वाईट कृत्यासाठी अशा 'गुणी' हातांचा वापरच का करावा?
म्हणूनच वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी दोन हात जोडून आपण नकार देऊया.
COMMENTS