Today, we are publishing परीक्षेच्या निकालाचा दिवस निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (परीक...
Today, we are publishing परीक्षेच्या निकालाचा दिवस निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (परीक्षेच्या निकालाचा दिवस निबंध) in completing their homework and in competition.
परीक्षेच्या निकालाचा दिवस निबंध
दहावीच्या वर्गात आल्यापासून घरीदारी, नात्यागोत्यात सर्वत्र मला एकाच गोष्टीचे सतत स्मरण करून दिले जात होते, “यंदा दहावीचं वर्ष आहे हं!" खरे पाहता, शालेय जीवन संपत आले म्हणून मन काहीसे उदास झाले होते. वर्ष केव्हा संपले ते समजलेही नाही. वाजत गाजत बोर्डाची परीक्षा पार पडली आणि त्यानंतरची दीर्घ मुदतीची सुट्टीही संपत आली.
आता वेध लागले होते परीक्षेच्या निकालाचे. वेगवेगळ्या तारखा कानी येत होत्या. अनेक तर्कवितर्क चालू असतानाच वृत्तपत्रांतून नक्की दिवस जाहीर झाला. मग मात्र मन त्या दिवसाची मोठ्या अधीरतेने वाट पाहू लागले. नाहीतर या अडीच महिन्यांच्या सुट्टीचा कंटाळाच आला होता. ओळखीची मंडळी सारखी विचारत होती, “काय गुणवत्ता यादीत येणार ना?" पण आता मात्र मनात थोडी धाकधूक वाटत होती. लिहिलेल्या उत्तरपत्रिका आठवत होत्या. माझ्या दृष्टीने त्या पूर्ण समाधानकारक होत्या आणि म्हणूनच परिक्षेच्या निकालाची अतीव उत्कंठा, आतुरता लागली होती.
निकालाचा दिवस आता अवघ्या चोवीस तासांवर येऊन ठेपला होता. मनात चिंतेचे वादळ असतानाही चेहरा आनंदी ठेवण्याची अवघड कसरत चालू होती. एवढ्यात शालान्त परीक्षा मंडळाची तार आली. परीक्षेत उत्तम यश मिळवून मी गुणवत्ता यादीत पाचवी आले होते. तीन बक्षिसेही मिळाली होती. एवढ्याशा त्या तारेने घरातले सारेच वातावरण पूर्णपणे पालटले. 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असं घरातील वातावरण झाले होते. मनातील मळभ नाहीसे झाले आणि सर्वत्र सोनेरी प्रकाश पडला.
अशी चांगली बातमी सर्वत्र पसरायला कितीसा उशीर लागणार ? हा हा म्हणता घरात गर्दी उसळली. शाळेतही हे वृत्त कळल्यामुळे स्वतः मुख्याध्यापक पेढे घेऊन घरी आले. सगळे आप्तजन, प्रियजन गोळा झाले. अभिनंदनाच्या वर्षावाबरोबर बक्षिसांचाही ढीग जमू लागला. या साऱ्या बक्षिसांत माझ्या आईच्या डोळ्यांतून ओसंडणारे आनंदाश्रू हे मला मिळालेले सर्वात मोठे बक्षिस होते.
वर्गातील मैत्रिणी जेव्हा भेटायला आल्या तेव्हा त्यांच्याही यशाचा आनंद त्यांच्या संगतीत मनमुराद लुटला. वर्षभर केलेल्या मेहनतीची आणि त्याचबरोबर मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचीही आठवण आली. या साऱ्या जल्लोषात दिवस केव्हा मावळला हे देखील कळलेही नाही.
आता उद्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. प्रवेश सहज मिळणार होता. एक नव्या आव्हानाच्या, अधिक मोठ्या अशा जगात प्रवेश करायचा होता. या नव्या विश्वातही आपण असेच उज्वल यश मिळवायचे असा मनोमन निश्चय करून निद्राधीन झालो.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS