Today, we are publishing माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay...
Today, we are publishing माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध मराठी for class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can use this Essay (My First Day in College Essay in Marathi) in completing their homework and in competition.
माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध - My First Day in College Essay in Marathi
बारावीत उत्तम गुण मिळवून मोठ्या प्रयासाने शहरातील ख्यातनाम महाविद्यालयात प्रवेश मिळविला. गरिबीमुळे जुनेपाने कपड़े चोपून घालून कसरत करत महाविद्यालय प्रांगणात पाऊल टाकले. अबब ! इतकी मोठी रंगीबेरंगी पोशाखातील विद्यार्थी बघून बुजलो. आता कोणाशी संवाद साधावा असा विचार करीत एका त्यातल्या त्यात साध्या मुलाशी बोललो, "भाऊ, तू कोणत्या शाखेत प्रवेश घेतला आहेस ?" "मी विज्ञानशाखा निवडलीय' असे तो उत्तरला, सरळपणाने त्याने मला योग्य ती माहिती दिली.
या महाविद्यालयात तीन शाखांचे अभ्यासक्रम शिकवत होते. १) कला २) विज्ञान ३) वाणिज्य. तळमजल्यावर विद्यार्थ्यांना वर्ग कोठे आहे हे संगणकावर दाखविले जात होते. माझ्या मनात प्राथमिक शाळेत असल्यापासून एक सोनेरी स्वप्न तरळत होते. खूप शिकायचे, मायमराठी भाषेत द्विपदवीधर व्हायचे व सुंदर कविता, कथा लिहायच्या. आज त्या वाटेवरील माझे हे पहिले पाऊल होते. मला महाकवी कालिदासांची 'आषाढस्य प्रथम दिवसे,' हे वचन आठवले. ही तुलना व्यर्थ होती; पण एक ग्रामीण भागातील मुलगा महानगरात स्वप्न साकार करायला आला होता. भल्या मोठ्या गर्दीत कसरतीने वर्गक्रमांक शोधला. चुकून तिसऱ्या मजल्यावरच शोध घेताना चूक कळली.
चूक सुधारून चौथ्या मजल्यावर वर्ग क्र. १२ मध्ये पोचलो. सर्व बाके रंगीबेरंगी नीटस पोशाखवाल्या मुलामुलींनी भरलेली होती. मुलींची संख्या जास्त होती. मी अवघडत शेवटच्या बाकावर स्थानापन्न झालो. घंटा खणखणली. टिपटॉप पोशाखवाले उपप्राचार्य (नंतर कळले.) वर्गात आले. प्रथम स्वत:चा परिचय त्यांनी करून दिला व नंतर काही विद्यार्थ्यांचा परिचय विचारला. फाडफाड इंग्रजीत लेक्चर सुरू झाले. विद्यार्थी आज जरा बुजले होते; पण महोदयांनी रुटीन चालू ठेवले. मी हतबल होऊन मान खाली घातली. एवढ्यात त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले. "उभा रहा. नाव काय तुझे? विषय कोणता ?"
Read also : मरावे परी कीर्ती रुपे उरावे निबंध मराठी
असा प्रश्नांचा भडिमार केला. थरथर कापत मी उभा राहिलो. सर्व वर्ग माझ्याकडे टकमक पाहत होता. मी शरमिंदा झालो. मनाचा हिय्या करून नाव सांगितले, 'दगडू धोंडू झेंडे.' हशा पसरला. “मी कला शाखेचा विद्यार्थी आहे. येथे मराठीचा तास आहे ना ?" ते खळाळून हसले. हसे झाले हो! अरे थोडक्यात घोटाळा झाला. “हा विज्ञान शाखेचा वर्ग आहे. शेजारच्या वर्गात जा. तेथे मराठीचा तास आहे." जा बाहेर म्हणताच मी खाली मान घालून बाहेर पडलो. माझे काय चुकले हेच मला उमजेना.
Related Essay : महागाईचा भस्मासूर मराठी निबंध
शेजारच्या वर्गाचा दरवाजा बंद होता. भीत भीत मी दारावर हलकेच टकटक केले आणि दार उघडले, रागावतच प्राध्यापक बाईंनी "उशीर का झाला," असा दटावणीवजा प्रश्न विचारला. मी कानकोंडा झालो. मी चाचरत स्पष्टीकरण दिले. आपादमस्तक मला न्याहाळताच त्या सौम्य झाल्या आणि त्यांनी मला शेवटच्या बाकावर जाऊन बस असे फर्मावले. वर्गात थोडी खसखस पसरली. मॅडमचे व्यक्तिमत्व चांगले होते. चेहऱ्यावर विद्वत्तेची आगळी झाक होती. "चला मित्र-मैत्रिणींनो आपण कविता पुढे समजावून घेऊ" असे म्हणताच वर्गात शांतता पसरली. मला उद्देशून त्या म्हणाल्या, "आज आपण कुसुमाग्रजांची कविता समजावून घेत आहोत. त्यांच्याविषयी सर्व माहिती आमची झाली आहे. तू नंतर समजावून घे."
मॅडमची वाणी रसाळ व मृदु होती. पहिल्या दिवशीच अध्ययनाला सुरुवात हा माझ्या स्वप्नासाठी मला शुभसंकेत वाटला. महाविद्यालय का ख्यातनाम आहे हे उमगले. आमची अर्धी कविता झाली. जुन्या वहीतच नीट अक्षरात लिहिण्याचा प्रयत्न केला. बाईंच्या बोलण्याची गती व माझ्या लिखाणाची गती यांचा मेळ जमेना. खरोखर आपल्या ध्येयाच्या वाटेवर हे महाविद्यालय मला पुढे नेईल असा विश्वास वाटला. तासिकेच्या शेवटच्या पाच-दहा मिनिटांत बाईंनी जे शिकविले त्याचे मनन, चिंतन करावयास सांगितले. माझ्या मनात आले की हे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एक मैलाचा दगड ठरेल. घंटा होताच माझी तंद्री भंगली. आयुष्यभर मी माझा विद्यालयातील पहिला दिवस विसरणार नाही. ही माझ्या आयुष्यातील अनमोल शिदोरी आहे.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
This Essay was Provided by bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS