Me Pahilela Aitihasik Sthal Nibandh in Marathi: Today, we are providing ऐतिहासिक स्थळाला दिलेली भेट मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9...
Me Pahilela Aitihasik Sthal Nibandh in Marathi: Today, we are providing ऐतिहासिक स्थळाला दिलेली भेट मराठी निबंध For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use this Essay on Me Pahilela Aitihasik Sthal to complete their homework.
ऐतिहासिक स्थळाला दिलेली भेट मराठी निबंध - Me Pahilela Aitihasik Sthal Nibandh in Marathi
दिवाळीमध्ये मामाच्या घरी गेलो होतो. माझ्या मामेभावंडांनी दिवाळीत दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा किल्ल्याची प्रतिकृती उभारली होती. किल्ले रायगड ! अपेक्षेप्रमाणे त्याला प्रथम क्रमांक मिळाला. आम्ही सर्वांनी त्याचे भरभरून कौतुकही केले आणि याच सुट्टीत किल्ले रायगडाला भेट दयायची, असे सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले. या भेटीचे नेतृत्व मामानेच स्वीकारले. Read also : माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध
महाराष्ट्रातील बहुतेक दुर्गांनी श्री शिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली. त्यांपैकीच शिवस्पर्शाने पुनीत झालेली भूमी म्हणजे दुर्ग-दुर्गेश्वर रायगड !
रायगडला जायचे निश्चित झाल्या दिवसापासून उत्सुकता अधिक चेतवली होती. आमच्या गाडीने आम्ही महाडमार्गे रायगडाच्या दिशेने आगेकूच करत होतो. ५ तासाच्या प्रवासानंतर आम्ही सर्वजण रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या 'पाचड' गावात पोहचलो. पहाटे ५ वाजताच प्रवासाला सुरुवात केली असल्याने गाडीतून उतरताच पोटात भूक जाणवू लागली. आजूबाजूला फिरून खाण्याचे पदार्थ मिळताहेत का, ते पाहिले. जिथे उतरलो होतो, त्या भागात शहरी सुधारणा पोहचल्या नव्हत्या, त्यामुळे एका घरगुती साध्या खाणावळीतच पोटपूजा उरकली. न्याहरी साधीच पण रुचकर होती. अगत्यही आपलेपणाचे होते. त्या खाणावळीच्या मालकाला आम्ही गडावर जाण्याबाबत विचारले आणि अपेक्षित माहिती त्यांच्याकडून मिळाल्याने आमचा पुढचा प्रवास सुकर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात आधी आम्ही 'पाचड' या गावात असणाऱ्या वीरमाता जिजाईच्या महालाचे दर्शन घेतले. महाल आता जीर्ण झाला आहे. तरी तो प्रशस्तपणाने आपले वेगळेपण राखून आहे. तिथे असलेल्या त्या वीर मातेच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आम्ही रायगडाच्या दिशेने पुढे सरकलो. Read also : अश्विन महिन्यातील निसर्गाचे वर्णन निबंध मराठी
गडावर जाण्यासाठी छोटीशी पायवाट आहे. जवळपास ३ तासाच्या चढणाने आम्ही गडावर पोहचलो. मध्येमध्ये चढत-थांबत उंचावरून पायथ्याच्या गावाचा निसर्गरम्य देखावा बघत, त्या आठवणी कॅमेऱ्यात बंद करत, आम्ही रायगडाच्या दरवाज्याला चरणस्पर्श करत गडावर पोहचलो.
गडावर प्रवेश करताच आजूबाजूच्या परिसराने मन भारून गेले. पूर्वेकडे समोर सह्याद्रीच्या रांगा, पवित्र सावित्री नदी, घनदाट जावळीचे खोरे, अगदी समोरच दुर्गम असा प्रतापगड, शेजारचा राजगड सर्वच पुस्तकातील चित्रासारखे वाटत होते. Read also : आमची सहल निबंध मराठी
महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन तर्फे गडावर भेट देण्याऱ्यांसाठी व तेथे मुक्काम करणाऱ्या गिरीप्रेमींसाठी निवासाची उत्तम सोय होती. आम्ही सुद्धा तिथेच मुक्काम ठोकला. सोबतचे सामान दिलेल्या खोलीवर ठेऊन गडावर भटकंतीसाठी निघालो.
संध्याकाळी सूर्य अस्ताला जाईपर्यंत गडावर बाजारपेठांसाठी राखून ठेवलेल्या जागा पाहिल्या. तलाव पाहिला. राजांचे अष्टप्रधान मंडळाच्या कचेऱ्या, अष्ट राण्यांचे महाल फिरून पाहिले. त्यावेळचे दगडी बांधकाम लाकडाचे महिरप अत्यंत मजबूतपणाने आपले अस्तित्व टिकवून आहेत. आमच्यासोबत गड फिरून आम्हाला माहिती देणाऱ्या आमच्या वाटाड्याने सांगितले की, राजदरबाराचे बांधकाम असे होते की शिवाजी राजांचे बोलणे दोनशे मीटरच्या पट्टीत ऐकणाऱ्याला खडान्खडा आणि स्पष्ट ऐकू येत असे. Read also : निसर्गाच्या सहवासात निबंध - निसर्ग पर्यटन निबंध मराठी
ज्या रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, त्याच गडावर हिंदवी स्वराज्याचा इतिहास ऐकताना आम्ही गुंग झालो होतो. शिवरायांच्या सिंहासनारुढ पुतळ्यास मराठमोळा मानाचा मुजरा करून आम्ही थोडे पुढे आलो. एव्हाना पोटात भूक चाळवली म्हणून क्षुधाशांतीत जाऊन आलो. भाकरी पिठले, मिरची कांदा, चटणीचा अस्सल गावरान बेत फक्कड जमला. जेवणाची लज्जत काही औरच होती. जेऊन निघालो ते थेट जगदीश्वराच्या मंदिराजवळ पोहचलो. तिथून पुढे मातृप्रेमाचे प्रतिक हिरकणीचा बुरुज, अपराध्यांना शिक्षेसाठी राखून ठेवलेले टकमक टोक, कडेलोट स्थळ सारे पाहिले. हे सारे पाहताना मनाचा थरकाप होत होता. उंच कडे न्याहाळताना नजरेचा थांग लागतच नव्हता. फिरता-फिरता शिवाजी राजांच्या त्या चिरनिद्रा घेतलेल्या समाधी स्थळी आलो आणि अगदी भारवल्यासारखे झाले. तिथे नतमस्तक झालो.
आता चांगलेच अंधारून आले. रात्रीचे जेवण उरकले. रात्रीच्या वेळी शिवकालीन वास्तृत उपस्थित राहून चांदण्यांचे सौंदर्य अनुभवायला मिळाले. आम्ही सर्वजण त्या क्षणांची वाट पाहत होतो. हळूहळू पूर्ण चंद्राने आकाशाच्या पटलावर आगमन करण्यास सुरुवात केली. याचे वर्णन शब्दबद्ध करणे शक्यच नव्हते. राजांची समाधी आणि त्यामागच्या पूर्णाकृती, चंद्रमाने तर डोळ्यांचे पारण फेडले. शीतल चांदण्यांचे शिंपण चालू होते. चंद्राचा तो स्निग्ध, शीतल प्रकाश बरेच काही बोलू पाहत होता. केवळ अवर्णनीय अप्रतिम असा तो सोहळा होता ! हळूहळू निशेचे साम्राज्य वाढू लागले. Read also : मी केलेली सहल / आमची सहल मराठी निबंध
ही वास्तू जुनी झाली आहे. गडावरील वाडे, इमारती कचेऱ्या काही ठिकाणी ढासळलेले आहेत. काही तग धरून उभे राहण्याच्या प्रयत्नात आहे. अशा महान वास्तूची जपवणूक करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज रायगडाची भग्नवस्था असली तरी त्याच्यातूनही त्याच्या सामर्थ्याची साक्ष पटते, यात शंकाच नाही. कारण इथल्या मातीत, दगडांत मराठी माणसाची संस्कृती, आणि अस्मिता दाटून राहिलेली आहे.
आयुष्यातील जवळपास ५० वर्षे स्वराज्यस्थापनेसाठी केलेली दगदग, सततची घोडदौड, राजकारण डावपेच यात व्यतीत केलेला वीर रायगडावर चिरनिद्रा घेत आहे.
'शिवरायांचे आठवावे रुप।शिवरायांचा आठवावा प्रताप।।'
या पंक्तीचे स्मरण करत उदयाच्या परतीची तयार करून आम्ही निद्राधीन झालो.
COMMENTS